Breaking
महाराष्ट्र

महिलांचा विकास झाला तरच राज्याचा, देशाचा विकास हीच मोदींची संकल्पना! लाडक्या बहिणीचा आशीर्वाद पाठीशी असला तर मोठी मिळते ऊर्जा–उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

0 9 1 3 9 0

 

 

शिर्डी( राजकुमार गडकरी)

साईंचा श्रद्धा सबुरीचा मंत्र माता-भगिनी खऱ्या अर्थाने पाळतात. या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी असल्या तर त्यातून मोठी ऊर्जा मिळते व त्यामुळेच कल्याणकारी योजना राबवण्याची प्रेरणा आणखी मिळत जाते. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिर्डी येथे महिला सबलीकरण अभियान व ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून येथे एमआयडीसी, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय संस्थांनचे शैक्षणिक संकुल, आदी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार मधुकर कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे ,डॉक्टर सुजय विखे पाटील, महसुल आयुक्त गेडाम ,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,संस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कुलगुरू पाटील ,पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रवीण देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कमलाकर कोते, कपिल पवार ,महिला अध्यक्ष कांचन मांढरे, सौ शालिनीताई विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताची जी संकल्पना मांडली असून त्यासाठी खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक समृद्धी व त्यांचा विकास साधने गरजेचे आहे. त्यासाठी 50 टक्के हिस्सा महिलांना देणे आवश्यक आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव, ते लखपती दीदी अशा अनेक योजना आणल्या. देशात एक कोटी लखपती दीदी झाल्या आहेत. त्यातून काम मागणाऱ्या महिलाच आता काम देत आहेत. महाराष्ट्रातही किमान लवकरात लवकर एक कोटी महिला लखपती दीदी झाल्याशिवाय राहणार नाहीत .असा आमचा प्रयत्न आहे. राज्याचा विकास या महिला शक्ती करू शकतात. म्हणूनच राज्य सरकारने लेक लाडकी योजना ,मुलींचे सर्व शिक्षण मोफत, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत, अशा विविध योजनांबरोबरच महत्त्वाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. 507 विविध कोर्समध्ये मुलींना शैक्षणिक फी माफ करण्यात आली आहे. तसेच महिलांना वर्षात तीन सिलेंडर मोफत देणार आहोत . राज्यात एक कोटी 90 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे पोहचले आहेत.लाडकी बहीण योजनेत राज्यातील सर्व बहिणींना दिवाळीची ओवाळी मिळणार आहे .ज्या महिलांना जिल्ह्यामध्ये केवायसी झाली नाही म्हणून पैसे मिळाले नाही .त्यांनाही केवायसी करून लवकर पैसे दिले जातील. लाडक्या बहिणींची राखी, त्यांचे प्रेम, पाठीशी असल्यामुळेच, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आम्हालाही मोठी ऊर्जा मिळते. असे सांगत सावत्र भावांच्या पोटात मात्र या योजनेमुळे आता दुखू लागले आहे. काही हायकोर्टात गेले आहेत. या योजनांमुळे पैशाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगत या योजना स्थगित करण्याची मागणी केली आहे. मात्र आम्हीही उच्च न्यायालयात जाऊन व चांगला वकील लावला आहे. या योजनांना स्थगिती येणार नाही .असा प्रयत्न आमचा राहणार आहे. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महायुतीच्या सर्व योजना रद्द करण्याचे आदित्य ठाकरे म्हणतात. मात्र तसे होणार नाही‌. चाळीस वर्षात ज्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. मग आमचे सरकार आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात. तर पोटात दुखण्याचे कारण नाही. पंधराशे रुपये ही महिलांना लाच दिली जाते असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाले आहेत. हा जनतेचा पैसा आहे .तो महिलांना, लाडक्या बहिणींना आम्ही देतो. महिलांना, लाडक्या बहिणींना लाचखोर म्हणणे कितपत योग्य आहे, असा त्यांनी यावेळी सवाल केला. शेतकऱ्यांना सुद्धा आठ हजार कोटी विम्या पोटी देत आहोत. त्यातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. सौर ऊर्जा योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची वीज देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न असणारी पश्चिम वाहिनी, पश्चिम महाराष्ट्रातले समुद्रात जाणारे नदीतील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून हा भाग सुजलाम व पाण्याच्या दृष्टीने सक्षम कसा होईल याचा प्रयत्न करणार आहोत व त्याचप्रमाणे 110 किलोमीटर लांबीच्या उजव्या गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. शिर्डी विमानतळ नूतनीकरणाबरोबरच साई संस्थान मधील 548 कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम करण्याचा सरकारने निर्णय घेतला तसेच 2018 मध्ये आपल्या हस्ते भूमिपूजन झालेले संस्थांनचे शैक्षणिक संकुलाचेही उद्घाटन आज होत आहे. याचा आनंद आहे. असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. पंतप्रधान मोदींच्या संकल्पने नुसार महिलांना अधिकाधिक आर्थिक सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे‌. त्यामुळे कुणी काही बोलले तरी लाडक्या बहिणींचा नक्कीच आम्हाला आशीर्वाद आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

सुरुवातीला प्रास्ताविक करताना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली असून या महिला सक्षमीकरणाचा अभियानाचा एक भाग म्हणून येथे साईंच्या भूमीत हा कार्यक्रम होत आहे. योग्य नियोजन केल्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना धन्यवाद आहेत. त्याचप्रमाणे शासनाने गोदावरी उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 191 कोटी रुपये शासनाने दिले आहेत. तसेच शिर्डी मतदारसंघात एमआयडीसी, शिर्डीत थीम पार्क व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाले आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जिल्ह्यात सुमारे अकरा लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा झाला आहे .ज्या राहिल्या आहेत. त्यांनाही सर्व पूर्तता करून या योजनेचा लाभ देण्यात येईल. असे सांगत आचार्य चाणक्य योजना, मुलींना मोफत शिक्षण ,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, अशा अनेक योजना सरकारने हाती घेतल्या आहे व त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे राज्यात मार्गदर्शक ठरणारा नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा तयार असून 850 कोटीचा आराखड्यास मान्यता द्यावी व अहिल्यादेवी होळकर यांचे देशातील सर्वोत्तम असे स्मारक करण्यासाठी ही आपण शुभेच्छा द्याव्यात. अशी मागणी ना.फडणवीस यांच्याकडे करत साई संस्थांनमध्ये 598 कंत्राटी कामगार कायम करण्यात आले तसेच उर्वरित कंत्राटी कामगारांनी कायम करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात यावा. अशी यावेळी त्यांनी मागणी केली. या कार्यक्रमात विविध विकास कामांची चित्रफित दाखवण्यात आली. विविध कामांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आजारी झाल्यामुळे त्यांना एक दिवसाच्या विश्रांतीमुळे ते येऊ शकले नाहीत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळविले असल्याचेही नामदार विखे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील महिला तसेच लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे