साधुसंत हे भगवंताकडे प्रापंचिक नाहीतर परमार्थिक ईच्छा व्यक्त करतात म्हणूनच त्यांच्या सर्व इच्छा होतात पूर्ण— ह भ प प्रतिभाताई जाधव
श्री साई सतचरित्र पारायण व हरिनाम सप्ताह- पुष्प सातवे
शिर्डी (राजकुमार गडकरी)
या प्रपंचात इच्छा पूर्ण कधी होत नाहीत. जसजसे प्रपंचात वय वाढते तशी प्रपंचाची आशा वाढत जाते. मात्र परमार्थ करताना साधुसंत हे भगवंताकडे इच्छा व्यक्त करत असतात .त्या प्रापंचिक नसतात. परमार्थिक असतात. म्हणूनच देवाच्या दारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधली . साधुसंत देवाच्या दारात गेल्यानंतर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात . त्याना या जीवन चक्रातून आनंद तरंग देत मुक्ती मिळते. असे ह भ प प्रतिभाताई जाधव यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सच्चरित्र पारायण व हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन मालिकेच्या सातवे पुष्प गुंफताना गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री आपल्या कीर्तनातून ते निरूपण करताना बोलत होत्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पाच चरणाचा अभंगावर निरूपण करताना त्या पुढे म्हणाल्या की, या मृत्यू लोकात अवतार घेतल्यानंतर इच्छा कधी पूर्ण होत नाही. मात्र या मृत्यू लोकात सुद्धा साधू संत हे प्रपंचिक नव्हे तर भगवंताकडे जी मागणी करतात. ती भगवंत नक्कीच पूर्ण करतो. कारण देवाच्या दारात साधुसंत आपल्या भक्ती मार्गातून पोहोचलेले असतात. त्यामुळे साधू संतांची सुखद इच्छा भगवंत स्वतः पूर्ण करतो. जरी साधू संतांनी ईश्वराकडे काहीही मागितले नाही तरी देव स्वतःहून इच्छा पूर्ण करण्यासाठी साधुसंतांना विचारतो. संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भगवंताकडे काही मागितले नाही .परंतु भगवंतांनीच स्वतः येऊन संत तुकाराम महाराजांना आपली काय इच्छा आहे, असे विचारले तरी संत तुकाराम महाराजांनी माझी कोणतीच इच्छा नाही. असे सांगितले . श्री भगवंताच्या आग्रह खातर माझ्या वैष्णव जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे लोक ते कोठेही वेगवेगळ्या ठिकाणी असू दे पण ते मला भेटू दे! अशी त्यांची मागणी, इच्छा त्यांनी भगवंताकडे केली. भगवंता कडून सर्व काही साध्य करण्याची शक्ती साधू संतांमध्ये आहे. मात्र आपण सर्वसामान्य माणसं प्रपंचात अडकल्यामुळे आपण प्रापंचिक इच्छा मागणी, देवाकडे करत असतो. पण ती कधी पूर्ण होत नाही. ती प्रपंचात जसं वय वाढत जातात तसी इच्छा, आशा वाढत जाते .खिशात शंभर रुपये असले तर हजार रुपये असावेत, हजार असले की, दहा हजार नंतर एक लाख, एक कोटी असावेत अशी अशा वाढत जाते. पण आळंदी ,पंढरीची वारी होऊ दे असं कुणी बोलत नाही. जसं एखादं थकलेलं गाढव खाली बसते. ते उठत नाही .त्याचा मालक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते उठत नाही .नंतर त्याला एक तोंडासमोर बांबू बांधून चाऱ्याची पेंडी लावली तर तो तेच गाढव मोठ्या आशेने उठते व चाऱ्यांचे पेंढी आपल्याला मिळेल या आशांने ते पळत सुटतं. असंच प्रपंचिक जीवनात सर्वसामान्यांचे होत असतं .जर सर्वसामान्य लोकांची जीवनात इच्छा पूर्ण होत असती तर पावसाळ्यातही पाण्याचे टँकर लागले नसते. समुद्रातील खारट पाणी गोड झाले असते. रावण मोठा श्रीमंत होता. सर्व काही असतानाही त्रिलोकी शिडी लावण्याची, समुद्राचे पाणी गोड करू अशा त्याच्या इच्छा होत्या. कोणी किती मोठा असला तरी प्रपंचिक जीवनात त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही .त्या वाढत असतात. असे अनेक दृष्टांत देत त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की मला याप्रमाणे जीवनात काही नको, कोणती इच्छा नाही. आशा नाही मात्र तुम्ही म्हणताच तर भगवंता मला माझ्या वैष्णव जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे माणसं मला भेटतील. तो दिवस माझ्याकरता सुदिन असेल ,असे माझ्या विचाराचे लोक मला भेटण्यासाठी माझा जीव
कासावीस होत आहे .ते भेटले तर माझा जन्म सफल होईल. त्यांची मी या डोळ्याने वाट पाहतोआहे. तया लागे जीव !होतो कासाविस! पाहतील वाट नयने!! असे सांगत कुठेही एक विचार असावा, भिन्नविचार ,हे मतभेद निर्माण करत असतात. महाराष्ट्रातून समृद्धी महामार्ग गेला .महाराष्ट्र समृद्ध झाला असे म्हटले जाते. मात्र या समृद्धी महामार्गामुळे पैसे मिळाले व भाऊ बहिणीचे नाते तुटायला लागले. तेव्हा एक विचार असावा, राग,वैर करू नये. त्यासाठी माता भगिनींनी आपल्या मुलांना लहानपणी पाळण्यात असतानाच जिजाऊ, भगतसिंगच्या आईसारखे संस्कार द्यावेत. तरच पुढची पिढी आणखी संस्कारमय होईल. असे सांगत त्यांनी आपल्या कीर्तनातून निरूपण करताना पुढे सांगितले की, श्री प्रभू राम वनवासाला निघाले. तेव्हा त्यांच्या मातेने त्यांना विचारले असता ते आपण दुसऱ्या मातेला भेटायला चाललो असे सांगितले तर ती दुसरी माता कोण असे विचारले असता माते तू मला जन्म दिल्यानंतर माझी जननी माता झाली, मात्र मी जन्माच्या अगोदर माझे अहोरात्र नामस्मरण करणारी माझी प्रतीक्षा करत असणारी अशी दुसरी माता म्हणजे शबरी माता आहे. तिला मी भेटण्यासाठी वनवासात चाललो आहे. असे श्री प्रभू रामाने सांगितले. म्हणजेच शबरी मातेची इच्छा ही भगवंतांनी पूर्ण केली. शबरी मातेची ही प्रापंचिक इच्छा नव्हती ती भगवंताला भेटण्याची इच्छा होती व ती पूर्ण झाली. असे त्यांनी दृष्टांत देत सांगितले. आज गोकुळाष्टमी आहे .हरिनाम किंवा सात दिवस चालणाऱ्या सप्ताहात देवाची ज्ञान भक्ती वैराग्य आध्यात्मिक परमार्थिक साधना केली जाते. पण काल्याच्या दिवशी भगवंताकडे मागणी केली जाते. हा वारकरी संप्रदायाचा अलिखित एक जणू नियम आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपण पारायण व सप्ताह केल्यानंतर भगवंताकडे मागणी करायची आहे. की मला भक्ती मार्गातून आपल्यापर्यंत पोचण्याची शक्ती दे! असं सांगत गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. या जन्मोत्सवाची कहाणी त्यांनी यावेळी सांगितले. व येथेही श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. समोरच असणाऱ्या, हार फुलांनी सजवलेल्या पाळण्यामधून श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत, फुलांची पुष्पवृष्टींचा वर्षाव करत ,श्रीकृष्णाचा जयजयकार करत ,गवळण म्हणत, नाचत गात येथेही मोठ्या आनंदात, उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. खिरापतीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री कीर्तन संपल्यानंतर ह भ प प्रतीक्षाताई जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने पद्माताई कापसे यांनी त्यांचा सत्कार केला. या दिवशी गोकुळाष्टमी व सोमवार उपवास असल्याने सरपंच ओमेश साहेबराव जपे व उपसरपंच विकास नानासाहेब जपे यांनी खिचडी ,भगर फराळाचा महाप्रसाद दिला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक, भजनी मंडळ, महिला पुरुष, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.