शिर्डी येथे श्री साईसच्चरित्र पारायण सोहळ्याला आज पाच ऑगस्ट रोजी सकाळी ग्रंथाची व साई प्रतिमेची सवाद्य मिरवणूक व पारायण मंडपात पूजन करून मंगलमय वातावरणात सुरुवात!
शिर्डी (राजकुमार गडकरी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज पहिल्या श्रावणी सोमवारी मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
आज सोमवारी सकाळी साईसमाधी मंदिरातून श्रींच्या श्री साईसच्चरित ग्रंथाची व फोटोची श्री हनुमान मंदिर व श्री.व्दारकामाई मार्गे रथातुन साई संस्थांनच्या श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थांनचे अधिकारी, कर्मचारी, नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त, पारायण वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारायण मंडपात श्री साई सतचरित्र ग्रंथ व श्री साई प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.या पारायण सोहळ्याचे हे ३० वे वर्ष आहे. आज सोमवार दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत नगर-मनमाड रोड लगत असलेले साईआश्रम येथील शताब्दी मंडपात या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे. येथील भव्य अशा मंडपात सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत पुरुष वाचक यांचे श्री साई चरित्र पारायण संपूर्ण झाले . या पारायण सोहळ्याला मोठ्या संख्येने पुरुष वाचक बसले आहेत.तर दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत महिला वाचकांचे श्री साईसच्चरित पारायण वाचन तसेच या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात होणार आहे. आज प्रथम दिवशी सोमवारी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत अनहद ग्रुप, नाशिक यांचा संगीतमय भक्तीसंगीत कार्यक्रम, सायंकाळी ०५.३० ते ०६.३० यावेळेत श्री. ज्ञानदेव आबा गोंदकर यांचा समाधीनंतर श्री साईबाबांचे साक्षात्कार या विषयावर प्रवचण, रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पा. कदम चाळाखेकर, नांदेड यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री साईसत चरित्र पारायण सोहळ्यांनिमित्त शिर्डीत होणाऱ्या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा साई भक्तांनी, भाविकांनी ,ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी श्री.सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, नाटय रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ यांनी केले आहे.