तामिळनाडूतील सेलम येथील शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन या पब्लिक ट्रस्ट तर्फे स्वातंत्र्यदिनी शिर्डी परिसरात सुमारे एक लाख साई भक्त व नागरिकांना अन्नदान! गेल्या 14 वर्षापासून स्वातंत्र्य दिनाला सुरू आहे हा उपक्रम! सावळीविहीर व परिसरातील सर्व शाळातील विद्यार्थी व नागरिकांना हा साईंचा खिचडीचा प्रसाद वाटप!
शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबांनी हयात असताना अन्नदानाला खूप महत्त्व दिले होते .स्वतः हंडीमध्ये अन्न शिजवून ते वाटत असत. हीच संकल्पना साई संस्थांनने साई प्रसादालयातून चालू ठेवली आहे.व हाच साईबाबांचा संदेश समजून, अन्नदान श्रेष्ठदान मानत ही साईबाबांची अन्नदानाची संकल्पना प्रत्यक्षात गेल्या 14 वर्षापासून तामिळनाडूतील सेलम येथील शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन राबवत आहेत. त्यांचे शिर्डी व परिसरातून मोठे कौतुक व अभिनंदन होत आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट ला दरवर्षी शिर्डी व परिसरातील गावांमधील शाळांतील विद्यार्थ्यांना, नागरिकांना, साईभक्तांना शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन ,या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, सेलम तामिळनाडू या संस्थेमार्फत साईंचा प्रसाद म्हणून अन्नदान केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, सवर्णापुरी सेलम ,तामिळनाडू येथील साईभक्तांद्वारे येथे येऊन शिर्डी व परिसरात सुमारे एक लाख साई भक्त, नागरिक, विद्यार्थी यांना अन्नदान करण्यात आले. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात गावातील पुरुष, महिला, तरुण यांना श्री साईचा खिचडीचा व शिराचा महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, सरपंच ओमेश साहेबराव जपे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे, गावातील सर्व मान्यवर, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सावळीविहीर बुद्रुक गावाच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशनचे यावेळी उपस्थित असणारे पदाधिकारी, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या 14 वर्षापासून साईंच्या अन्नदानाची संकल्पना घेऊन शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, सवर्णापुरी, सेलम, तामिळनाडू यांच्यावतीने शिर्डी व परिसरात येऊन आम्ही या ट्रस्टचे सेक्रेटरी ए. एल. जयकुमार व एम. मुरूगनाथम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदानाचा म्हणजे साईंचा खिचडीचा प्रसाद वाटप करतो. साईंची सेवा म्हणून हा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला राबवतो. सुमारे एक लाख लोकांना साईंचा प्रसाद म्हणून आम्ही हे अन्नदान करत असून सुमारे 14 रिक्षांमधून शिर्डी परिसरातील गावांमध्ये ,शाळांमध्ये हा साईंचा प्रसाद पोहोचवला जातो व तिथे वाटप केले जाते. त्यासाठी त्या शाळेतील शिक्षक, गावातील ग्रामस्थही सहकार्य करतात. त्यासाठी सेलम तामिळनाडू येथून सुमारे साडेतीनशे सदस्य आलेले आहेत. पुढेही दरवर्षी पंधरा ऑगस्टला असाच अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवणार आहोत. साईंची कृपा म्हणूनच व साईंची अन्नदानाची संकल्पना म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. श्री साईबाबाच हे कार्य आमच्याकडून करून घेतात. त्यामुळे आम्हाला कसलीही अडचण येत नाही सातत्याने दरवर्षी हा उपक्रम आम्ही श्री साईंच्या कृपाशीर्वादाने राबवतो. त्यामुळे आम्हालाही खूप समाधान, आनंद मिळतो. उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला त्या त्या ठिकाणाच्या ग्रामस्थांचे, शिक्षकांचे पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य मिळते.त्यांनाही धन्यवाद आहेत. असे यावेळी त्यांनी सांगितले. या वर्षीही 15 ऑगस्ट रोजी सावळीविहीर बुद्रुक येथे सर्व शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी, महिलांनी या साईंच्या महाप्रसादाचा, अन्नदानाचा लाभ घेतला.