जगाच्या कल्याणासाठी व जगाला चांगला उपदेश देण्यासाठीच साधू संत अवतरतात!-ह भ प सुरेश महाराज आढाव
शिर्डी( राजकुमार गडकरी)
जगाला चांगला उपदेश करणारे संत असतात, जगाच्या कल्याणासाठी साधुसंत अवत्तीर्ण होतात ,हिंदू धर्मावर आलेल्या ग्लानीचे निरसन करण्यासाठी साधू महंत असतात .मात्र अशा साधू संतांवर अर्वाच्च भाषेत बोलले जात आहे. त्याचे खंडन करणे गरजेचे आहे. असे सांगत जगाचं भय व जीवनात दुःख निवारण्यासाठी संत असतात. अनाथाचा नाथ संत होतात. त्यामुळे एक वेळ देवाकडे न गेलं तरी चालेल पण संतांकडे गेलं पाहिजे व पूर्ण श्रद्धा, विश्वास ठेवून गेलं पाहिजे ,अस चिंचखेडा (कन्नड) येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षक ह भ प सुरेश महाराज आढाव महाराज यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांसमोर मार्गदर्शन करताना सांगितलं.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई चरित्र पारायण व हरीनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
ह भ.प सुरेश महाराज आढाव पुढे म्हणाले की, देह नाशिवंत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देह रोगाचे भंडार आहे .दुःखाचे कोठार आहे. शरीर दुर्गंधीची धार , अपवित्र शरीर कोठार !असे त्यांनी म्हटले असून पुढे म्हटले की,शरीर उत्तम चांगले !शरीर सुखाने भोसले! शरीर चांगले सुद्धा आहे मात्र देवाला साधलं तर शरीर चांगलं आहे, नाहीतर देह नाशवंत आहे, देह पवित्र करण्याचे काम नामस्मरणानेच होतं .हरिपाठ मुखी गायला तर पुण्य होतं. देह पवित्र होतो .देहाची पवित्रता व वाणी पुण्य होते .वाणी भजनाने पुण्य होते व वाणी पुण्य झाली की देह पवित्र होतो .संतांचे नाव घेतले तर पाप जाते. पाप जाणे म्हणजे देहातील काम ,क्रोध ,मंद,मस्य अहंकार जाणे होय. त्यासाठी भजन ,प्रवचन ,कीर्तन, हरिपाठ करणे महत्त्वाचे आहे. तीर्थयात्रा, योग,याग करण्यापेक्षा केशवा माधवा म्हटलं तरी या नामानं सर्व साध्य होतं .केशवा माधवा नामस्मरण हे साधं सोपं आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीतून संत ज्ञानेश्वर आपल्यात आहेत. श्री साई चरित्र ग्रंथा मधून , पारायणातून श्री साईनाथ आपल्यामध्ये आहेत तर तुकाराम महाराज हे त्यांच्या गाथेतून आपल्यामध्ये आहेत. पण ते ओळखलं पाहिजे. त्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. साई भक्तांनी साईंवर विश्वास टाकला म्हणूनच श्री साईंनी आपल्या हाताने, विभूतेने व स्वप्नखत येऊन अनेकांचे दुर्धर आजार बरे केले. पण त्या साईभक्तांचा साईवर विश्वास होता, श्रद्धा होती. विश्वासाने पारायण ,नामस्मरण, करा, देवाचे भजन करा, आयुष्यात पुण्य मिळतं .देह पवित्र होतो .त्यामुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला. भक्त प्रल्हादला नामस्मरणाने तारले तर देवाच्या हाताने हिरणकश्यपु मरण आले म्हणून त्याचे कुळ उ्दरले .अशी नामस्मरणात शक्ती आहे. सध्याच्या युगात अनेक साधुसंत पाहायला मिळतात. मात्र खऱ्या साधूला खोटं म्हटलं तर काही फरक पडत नाही. पण खोट्या साधूला खरं म्हटलं तर वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितलं. बाहेरून निर्मळ होण्यापेक्षा आतून निर्मळ व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने देवाचं नामस्मरण करणे गरजेचे आहे. असं सांगत त्यांनी श्री साईबाबांचा शिर्डी व हा परिसर आहे. हा संतांचा परिसर असल्यामुळे हा परिसर पुण्यवान आहे. पुण्यवान परिसरात आपण सगळ्यांनी देवाचं नाव नामस्मरण, भजन ,पूजन, हरिपाठ केला पाहिजे. विश्वास, श्रद्धा ठेवून केला तर नक्कीच त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी अनेक उदाहरणे, दाखले देत आपल्या कीर्तनातून उपस्थितांना सांगितले. यावेळी कीर्तनांनंतर महाप्रसादाची पंगत देणारे नानाभाऊ कदम यांच्या हस्ते कीर्तनकार हभप सुरेश महाराज आढाव यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी पुरुष, महिला ,भाविक ,भजनी मंडळ , पारायणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.