केंद्र सरकारने साखर कारखानदारीला पाठबळ देण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले म्हणूनच अनेक कारखाने जगले–ना. राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची 75 वी अधिमंडळाची सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात संपन्न!
प्रवरानगर (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने साखर कारखानदारीला पाठबळ देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. केंद्राच्या इथेनॉल धोरणांचा लाभ सर्वच कारखान्यांनी घेतला. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे सगळे कारखाने जगले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार साखर कारखाने टिकून ठेवण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले . मात्र त्याचे श्रेय मोदी व शहा ना देण्याची विरोधकांची दानत नाही अशी टीका करत त्यांनी आपल्या कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांचे आहे. या कारखान्याने अनेक संक्रमण पाहिली. मात्र अनेक आव्हानावर मात करत यशस्वीपणे वाटचाल चालू ठेवली आहे .असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधी जाहीर केलेल्या तीन हजार रुपयांच्या भावांमध्ये अधिक दोनशे रुपये देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची ७५व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
प्रथम पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ सुजय दादा विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे, प्रवरा भाजी पाला सोसायटीच्या अध्यक्षा गीता थेटे, बँकेचे उपाध्यक्ष मॅचिंद्र थेटे,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश ससाणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणा साहेब कडू,शांतीनाथ आहेर,ट्रक सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील जाधव, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, संचालक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार विखे पुढे म्हणाले की,निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून केवळ आमची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधक मित्रांकडून होत आहे. पण धरणातून पाणी काढण्याचे पुण्य हे विखे कुटुंबांनाच मिळाले. स्वतःला जलनायक म्हणून घेणाऱ्यांनीच समन्यायी पाणी वाटपाचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली. असा विरोधकांना टोला मारत सात वर्ष मंत्री राहिलेल्या माजी मंत्र्यांना जिल्ह्याच्या हिताचा एकही निर्णय घेता आला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी केलेली 50 कामे दाखवतो. तुमचे एक तरी काम दाखवा. असे थेट आव्हानही यावेळी नामदार विखे पाटील यांनी विरोधकांना केले.
आपल्या काळात जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे .अहिल्याबाई होळकरांचे स्मारक, तीर्थक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टी, पशुवैद्यकीय महाविद्यालय ,शिर्डी, नगर आणि बेलवंडी येथे एमआयडीसी व त्यासाठी जागेची उपलब्धता ,खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी व आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनीचा महत्त्वपूर्ण निर्णय ही मोठी उपलब्धी महसूल मंत्री म्हणून आपल्याला करता आली. असे सांगत पश्चिमी वहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी सरकारने आता सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे यासाठी 62 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही नामदार विखे पाटील यांनी सांगत आगामी एक दोन वर्षात हे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवून खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आपले ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आणि परिसरात शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप आपण उपलब्ध करून देणार आहोत. असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. अहवाल वाचन झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच संचालक कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.