Breaking
ब्रेकिंग

शिर्डीत साई संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात! अनेक साई पालख्या व हजारो साई पदयात्री शिर्डीत दाखल! रविवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले!

0 9 1 3 8 2

 

शिर्डी (राजकुमार गडकरी)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्‍हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्‍य ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विणा घेऊन तर मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व प्र. प्रशासकीय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय, प्रज्ञा महांडुळे, प्रशासकिय अधिकारी यांनी व्दितीय अध्याय, गोरक्ष गाडीलकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी तृतीय अध्याय, तुकाराम हुलवळे, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांनी चौथा अध्याय व अभयकुमार दुनाखे, प्राचार्य आयटीआय यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

उत्सवाचे निमित्ताने मा.जिल्‍हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्‍य ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. मिनाक्षी सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे व विश्‍वनाथ बजाज तसेच मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाचे पहिल्‍या दिवशी अमेरीकेचे वाणिज्‍य महादुतावास श्रीयुत माईक हॅंकी यांनी श्री साईबाबांच्‍या मध्‍यान्‍ह आरतीला हजेरी लावली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.श्री मंदार व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा मंदिराचे उत्‍तर बाजुकडील स्‍टेजवर संपन्‍न होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्‍वरधुणी साई गीतांचा कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्न होईल. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल. तसेच पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडे ठेवण्‍यात येईल.

यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै. अमेरीका यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट व साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्‍या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्‍या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्‍या पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली.

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार २१ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व दुपारी ०१ ते ०३.०० यावेळेत श्री संजीव कुमार, पुणे यांचा भजन संध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री निरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व सोमवार २२ जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे