शिर्डीत रात्री श्रीरामउत्सवानिमित्त लाईट माळा लावताना क्रेनला कारची धडक! एक ठार! चार जखमी! नगर मनमाड महामार्गावर डी मार्ट मॉल जवळ घडला अपघात!
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
नगर मनमाड रस्त्यावर शिर्डी साकुरी शिवावर रविवारी रात्री साडेदहा च्या सुमारास डी मार्ट मॉल समोर भीषण अपघात झाला असून श्री रामनवमी उत्सवानिमित्त विद्युत रोशनाईचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या शिर्डी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाचे क्रेन वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाआहे. या अपघातात 4 जण जखमी तर प्रवीण गवांदे हा युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने शिर्डी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थ व नागरिकांनी एकच गर्दी करत तातडीने मदत कार्य सुरू केले व जखमींना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले.
शिर्डीत सध्या श्री रामनवमी निमित्त विद्युत रोषणाईचे काम सुरू असल्याने शिर्डी नगरपरिषदेचे विद्युत विभागाचे क्रेन वाहन विद्युत रोषणाईच्या लाईट माळा क्रेनच्या साह्याने नगर मनमाड रस्त्याच्या मधोमध लावत असताना क्रेनची पार्किंग लाईट सुरू होती आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी एक खाजगी विद्युत काम करणारा तरुण रस्त्यावर उभा राहून दिशा दाखवत होता.
तरीही भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी इको मारुती वाहन चालकाने उभ्या असलेल्या तरुणाला उडवत थेट क्रेन वाहनाला धडकून मोठा अपघात झाला आणि या अपघातात मात्र प्रवीण गवांदे हा तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या भिषण अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ही धडक इतकी जबरदस्त होती की,इको वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात इको वाहन चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून कारमधील महिलेच्या डोक्याला मार लागला आहे.मयत गवांदे हा शिर्डी येथील लायटिंग व्यवसाईक सुनील बाराहते यांच्याकडे कामाला होता.ही दुर्देवी घटना घडल्याने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाता संदर्भात शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.