राहुरीत शेतकऱ्यांचे कांद्यासाठी चक्का जाम आंदोलन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले
राहुरी : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या ४० टक्के निर्यात कर तात्काळ रद्द करावा. या मागणीसाठी आज स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. यावेळी शेतकऱ्यांनी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले. पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याने आंदोलन चिघळल्याचे चित्र यावेळी दिसुन आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी मागे घ्यावी. तसेच कांद्याला सरसकट ३ हजार रुपये प्रति किंटल हमीभाव जाहीर करावा. ३१ मार्च पर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊ केले पण ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ते त्वरीत जमा करावे. या मागण्यांसाठी आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे बाजार समीती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही. असा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून केंद्र सरकार विरोधात तिव्र संताप व्यक्त केला. सूमारे अर्धा तास सूरु असलेल्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन कर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. पोलिस प्रशासनाने रवींद्र मोरे ताब्यात घेतल्या नंतर दूपारी उशीरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरु होते.
केंद्र सरकार कडुन शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय होत आहे. आता शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी. असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, दिपक तनपूरे, प्रशांत कराळे, कृष्णा मुसमाडे, अप्पासाहेब ढूस, बाळासाहेब जाधव, जुगलकिशोर गोसावी, पिंटूनाना साळवे, अण्णासाहेब केदारी, बाळासाहेब आढाव, खंडू केदारी, नानासाहेब गाडे, पोपट सोमवंशी, गोरख रक्ताटे, गोरख डोंगरे, अप्पासाहेब रक्ताटे, अभिजीत सोमवंशी, बापूसाहेब सोळुंके, कृष्णा सोमवंशी, दिनेश वराळे, सतिष पवार, दत्तात्रय मोरे, रवींद्र निमसे, गणेश चिंधे आदि कार्यकर्त्यां सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आंदोलन प्रसंगी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.