देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.! प्रहारची मागणी
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहुरी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी कर्तव्यात कसूर करून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केल्याने व खोटी माहिती दिल्याने त्यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, प्रहारचे देवळाली प्रवरा शहर संघटक प्रकाश वाकळे यांनी अहमदनगर चे निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना समक्ष भेटून तक्रार केली आहे. तसेच सदर तक्रार राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ साहेब, प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्याकडे ईमेल द्वारे पाठविली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देणेत आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की,
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुळा धरण ते देवळाली प्रवरा नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईनवर एक इंच आकाराचे जवळपास १२ ठिकाणी अनधिकृत नळजोड बसविण्यात आले असून त्यामधून जवळपास प्रतिदिन वीस लाख लिटर पाणी वाया जात असल्याने ते अनधिकृत नळ जोड तात्काळ बंद करावे.. या व इतर मागण्यांबाबत आम्ही देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांना दिनांक ०५/०९/२०२३ रोजी लेखी निवेदन दिले.
तदनंतर एक महिना उलटूनही देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी प्रहार च्या पत्रावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा तसे कळविले नाही. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुळा धरणातून मीटरद्वारे विकत घेतलेले प्रतिदिन जवळ्पास २० लाख लिटर पाणी सलग एक महिना वाया गेले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नागरिकांची दैनंदिन गरजही जवळपास २० लाख लिटर असल्याने देवळाली प्रवराच्या नागरिकांचे जवळपास ५००० नळ कनेक्शनचे पाणी वाया गेले असा ढोबळ मानाने हिशोब काढला तर १८०० रुपये नळपट्टी या दराने देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे ९० लाख रुपये प्रतिवर्ष या हिशोबाने जवळपास ०७ लाख ५० हजार रुपये एका महिन्याचे. किंवा, एका महिन्याची जी काही पाणीपट्टी नगरपरिषद पाटबंधारे विभागाला भरते तितके आणि मुळा धरणाचे जॅकवेल वरील इलेक्ट्रिक मोटारींचे विज बिल व पाणीपुरवठा कर्मचारी पगार आणि या योजनेला घेतलेल्या कर्जाचे एका महिन्याचे व्याज आदी रक्कमेचे नुकसान केवळ मुख्याधिकारी साहेबांच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेला आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी नगरपरिषदेवर भव्य आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलन काढण्याची दिनांक १०/१०/२०२३ रोजी नोटीस देण्यात आली.
तदनंतर देवळाली प्रवरानगर परिषदेने १६/१०/२०२३ रोजी ‘देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व अनधिकृत नळजोड बंद केल्याचे’ खोटे लेखी पत्र देऊन आम्हाला कळविले. व आंदोलनापासून परावृत्त होण्याची विनंती केली. त्यामुळे हे पत्र आल्याचे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १७/१०/२०२३ रोजी सकाळी आम्ही स्वतः मुख्याधिकारी यांनी उपरोक्त अनधिकृत नळजोड बंद केल्याची खात्री करण्यासाठी देवळाली प्रवरा ते मुळा धरण या मुख्य पाईप लाईनची समक्ष जाऊन पाहणी केली. व जीपीएस लोकेशन कॅमेराचे साह्याने सर्व अनाधिकृत नळजोड सुरूच असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून मुख्याधिकारी हे धादांत खोटे बोलत असल्याचे दि. १८/१०/२०२३ रोजी जी पी एस लोकेशन फोटो जोडलेले निवेदन देऊन नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिले आहे. व त्यामुळे नगरपरिषदेचे व पर्यायाने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे व होत असल्याचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी आम्हाला खोटी माहिती देऊन आमची दिशाभूल केल्याचे व त्यामुळे नगरपरिषदेचे नुकसान झाल्याने आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची त्यांना पूर्व सूचना दिली.
त्यामुळे विनंती की, वरील सर्व विवेचन पाहता देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार अहेर यांनी कर्तव्यात कसूर केल्याने नगर परिषदेचे व पर्यायाने देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व त्यांनी आंदोलनकर्त्यांना अनधिकृत नळ कनेक्शन तोडल्याची लेखी स्वरुपात खोटी माहिती देऊन शहरातील नागरिकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्व संदर्भीय पत्रे आणि जीपीएस लोकेशन द्वारे काढलेले फोटो त्यावरील तारीख वेळ आणि ठिकाण या सर्व माहितीची सखोल चौकशी करून चौकशीअंती देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती निवेदनाच्या शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने केली आहे.