वारीतुन संस्कृतीची जपवणुक …ह.भ.प.संदीप महाराज चेचरे
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीविठ्ठल रुक्मिणी हे सामाजिक, आध्यात्मिक भक्ती आणि एकसंघतेचे प्रेरणास्थान असून वारीसारख्या उपक्रमातून संस्कृतीची जपवणूक होते, असे प्रतिपादन संदीप चेचरे महाराज यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकतेच आषाढी एकादशीनिमित्त आषाढी वारीचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोहगाव येथील साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुलचे प्रमुख संदीप चेचरे महाराज हे होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची टाळ, मृदुंग, पखवाजाच्या गजरात संकुलात पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भजन, अभंगाच्या तालावर फेर धरत रिंगणातील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे संदीप चेचरे महाराज यांनी सांगितले की, आषाढी वारीची परंपरा की संत ज्ञानेश्वरांपासून अखंडादी सुरू असून या वारीतून महाराष्ट्राची लोकधारा, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडत आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात मोहित जोशी, दर्शन लहामगे, हर्षल गोरे, सार्थक जोशी, रुद्र भोकनळ आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यालयाचे लेखनिक कचरू जोर्वेकर यांनी अभंग सादर करून सर्वांना विठ्ठल नामाच्या जयघोषणात तल्लीन केले. सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले तर नरेंद्र ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
.