सहकार महर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन..डॉ.राम पवार
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
लोकनेते पद्मभूषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार दि. ३० आणि बुधवार ३१ जानेवारी २०२४ रोजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राम पवार यांनी दिली. सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा ही पद्मश्रींच्या उत्तुंग कर्तृत्वाची स्मृती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. गेल्या ४१ वर्षापासून तत्कालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर विचार मंथन घडवून आणण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यांच्यातील सुप्त वक्तृत्वगुणांना चालना मिळावी या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील एक मानाची वादविवाद स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. स्पर्धेचे हे गौरवशाली ४२ वे वर्षे असून; यावर्षी G 20 च्या अध्यक्षपदामुळे देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू झाली! हा प्रस्ताव वादविवादसाठी ठेवला आहे. अशी माहिती या स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.
महाविद्यालयीन युवकांना वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता दैनिक पुण्यनगरी चे वृत्तसंपादक श्री विकास अंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री कैलास नाना तांबे पाटील यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होत असून; स्पर्धेचा समारोप समारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ.भास्करराव भास्करराव खर्डे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. दरवर्षी या स्पर्धेला स्पर्धक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. स्पर्धक विद्यार्थ्यांना मोफत भोजन व निवास व्यवस्था केली जाते. तसेच बाहेरगावच्या स्पर्धक विद्यार्थ्यांना शिर्डी येथे साई दर्शनाची ही व्यवस्था केली जाते. हे या स्पर्धेचे एक वेगळेपण आहे. उत्कृष्ट नियोजन व संयोजन असल्यामुळे स्पर्धकही या स्पर्धेविषयी नेहमीच उत्सुक असतात. राज्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे अवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.