साईभक्तांचे सापडलेले मौल्यवान वस्तू परत केलेल्या कर्मचाऱ्यांचा संस्थान तर्फे सत्कार! त्यामुळे कर्मचाऱ्यात सकारात्मक निर्माण होत आहे ऊर्जा! भक्तांकडूनही होते कौतुक!
शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबांच्या दर्शनाकरीता देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्त येत असतात. या साईभक्तांना सेवा-सुविधा पुरविणेचे काम संस्थान कर्मचारी प्रामाणिकपणे करीत असतात. हे काम करत असतांना विविध विभागातील कर्मचा-यांना वस्तु अगर पैसे सापडतात. सापडलेली वस्तु अगर पैसे प्रामाणिकपणे जमा करणा-या कर्मचा-यांचा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी वेळोवेळी सत्कार करतात. याबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे/सिनारे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते.
दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी गेट नं.०३ येथे डयुटीवर कार्यरत असणा-या कंत्राटी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई नागरे यांना रुपये १८,७५०/- सापडले. सदरची रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली. ज्या साईभक्तांचे पैसे हरवले होते त्यांनी संरक्षण कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांची हरवलेली रक्कम रु. १८,७५०/- परत करणेत आली. ज्या भक्ताचे पैसे हरविले होते ते त्यांना परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सापडलेले पैसे प्रमाणिकपणे जमा करणा-या माहिला सुरक्षारक्षकाचे आभार मानले. या घटनेची माहिती मुंबई येथील एका साईभक्तांस मिळाली असता त्यांनी श्रीमती नागरे यांना प्रोत्साहनपर गूगल पे ने रु. ५०००/- पाठवले. श्रीमती नागरे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी यांनी शाल व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला. यामुळे सर्व कर्मचा-यांत सकारात्मक उर्जा निर्माण होत असून संस्थानच्या नावलौकिकात वाढ होत आहे. याघटने बद्दल श्रीमती नागरे यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.