ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांना समाज भूषण पुरस्कार पुणे येथे प्रदान!
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
पुणे येथील विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा महत्त्वाचा व प्रसिद्ध असा समाज भूषण पुरस्कार कोपरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व
सावळीविहीर येथील मा. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांना अतिशय मंगलमय वातावरणात पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये नुकताच प्रदान करण्यात आला. पुरुषोत्तम पगारे सर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कोपरगाव, सावळीविहीर व संपूर्ण अ, नगर जिल्ह्यासह राज्यांमधून अभिनंदन होत आहे. त्यांचे प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.तर ठीक ठिकाणी सत्कारही होत आहेत. यापूर्वीही पुरुषोत्तम पगारे सरांना सावळीविहीर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिक्षक म्हणून सेवा करत असताना भारताचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार काही वर्षांपूर्वी देण्यात आला होता. त्यांनी एन.सी.सी चेही मोठे काम केले आहे.
पुरुषोत्तम पगारे सर हे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक गवारे मामा फाउंडेशन कोपरगावचे संस्थापक सचिव, महाराष्ट्र राष्ट्र भाषा सभा, पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेवरही काम केले आहे.
श्री.पुरुषोत्तम पगारे सर गेल्या ४० वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक चळवळीत विविध संस्थाच्या पदावर कार्यरत आहे. गेल्या ३३ वर्षापासून शैक्षणिक दृष्ट्या वंचितासाठी विनाअनुदानित रात्र शाळा ते चालवित आहे. क्रीडा मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मोठे काम आहे .परित्यक्ता, स्रियांचे प्रश्न सोडविणे, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार व प्रसार, हिंदी शिक्षकांची प्रबोधन शिबीरे घेणे, हिंदी विषय शिक्षकांना पुरस्कार देणे व संघटन चालविणे, राज्य पातळीवर सामाजिक कार्यकर्त्याना पुरस्कार देणे, वाचन संस्कृती वाढविणे. वंचितांची विविध कामे करणे. अशी अनेक समाजोपयोगी कामे ते अनेक वर्षापासून करीत आहे . रयत शिक्षण संस्थेत असतांना शालेय पातळीवर विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मा. प्रा. डॉ. प्रशांतजी साठे, बी.एम.सी.सी. कॉलेज पुणे यांच्या हस्ते त्यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे येथील वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व बृहन महाराष्ट्र संशोधन केंद्र समन्वयक डॉ. प्रशांत विठ्ठल साठे यांनी वेळेचे महत्त्व याची अतिशय सुंदर अशी विषय मांडणी करीत मौलिक अश्या विचारांनी सर्वांना प्रभावित केले. त्याच प्रमाणे मा.श्री. मयूरजी भावे, उपसंपादक दै. सकाळ, यांनी सामाजिक संस्था करीत असलेले कार्य व आज एकसंघ, एक राष्ट्र म्हणून एकत्र असण्याची आवश्यकता यावर अतिशय प्रखर आणि प्रभावी विचार मांडले. यावेळी सौ. ज्योत्स्नाताई पगारे, कृष्णा सुरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक फौंडेशनचे संस्थापक सदस्य विवेकानंदजी सुतार यांनी केले. यावेळी राज्यातून आलेल्या १० ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व अनेक गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. पुरुषोत्तम पगारे सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर पुरुषोत्तम पगारे सर यांनी म्हटले आहे की, हा पुरस्कार ही केवळ माझ्या कार्यकर्तृत्वाची ओळखच नव्हे तर आपण सर्वजण माझ्या पाठीशी सदैव उभे आहात .हे माझ्या पुरस्काराचे खरे गमक आहे.आपले प्रेम, सहकार्य, अतुलनीय मार्गदर्शन व आशीर्वाद या सर्वांचे प्रतिबिंब म्हणजे हा माझा पुरस्कार आहे. आपण सर्व मित्र परिवार, नातलग व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मला दिलेल्या शुभेच्छा व प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर केलेले अभिनंदन, केलेला सत्कार याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करत धन्यवाद मानले आहे.