श्रीक्षेत्र पंचाळे येथे संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 177 व्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भरला वारकऱ्यांचा महाकुंभ! दररोज येथे संत ,महंत, नेते, वारकरी व लाखो भाविक येऊन दर्शन, प्रवचन, कीर्तन व महाप्रसादाचा घेत आहेत लाभ!
श्रीक्षेत्र पंचाळे ( राजकुमार गडकरी)
श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह ,श्रीक्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे मोठ्या उत्साहात सुरू असून दररोज लाखोच्या संख्येने भाविक येथे प्रवचन, कीर्तन ,दर्शन ,हरिपाठ, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
श्रीक्षेत्र पंचाळे येथे शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी या अखंड हरिनाम सप्ताह ला मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. लेने को हरिनाम !देने को अन्नदान!! तरने को लिनता,! डुबने को अभिमान!!, असा संदेश देणारे श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या व संत नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे श्रीक्षेत्र पंचाळ येथे वारकऱ्यांचा महाकुंभ भरला आहे .सात दिवस चालणारा हा वारकऱ्यांचा महा कुंभ म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरत आहे. येथेही पहिल्या दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शहा, पंचाळे रस्त्याच्या लगत हा हरिनाम सप्ताह होत आहे.
श्री क्षेत्र पंचाळे येथे सुसज्ज भव्य मंडपात योगीराज गंगागिरीजी महाराज , संत नारायणगिरीजी महाराज अशा अनेक साधुसंतांच्या प्रतिमेसमोर कपाळी गंध ,हातात टाळ, मुखाने हरिनाम गात शेकडो वारकरी अहोरात्र हरी नामाचा जागर करत आहे, भजन, हरिपाठ ,व अखंड विना व धर्म ध्वजाखाली अखंड होम सुरू आहे.दररोज किर्तन स्टेजवर सकाळी किर्तन, दुपारी प्रवचन , परत दुपारी कीर्तन तर त्यासमोरील भव्य मैदानात दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मांडे पुरणपोळीचा महाप्रसाद तर रविवार दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आमटी भाकरीचा महाप्रसाद, शुक्रवार 16 ऑगस्टला एकादशी असल्याने खिचडी फराळाचा महाप्रसाद व शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर बुंदी चिवड्याचा महाप्रसाद राहणार आहे. त्याचीही जोरदार तयारी सुरू आहे. येथे प्रवचन ,कीर्तनासाठी भव्य असा स्वतंत्र मंडप, हरी जागर व भजन यासाठी भव्य मंडप, मंहत रामगिरीजी महाराज यांचाही समोरच मंडप, त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी भव्य असे शेड, गॅस शेगड्या ,आचारी, कर्मचारी यांचा ताफा, कृषी प्रदर्शनासाठी भव्य असे दोन शेड, भाविकांना महाप्रसाद व्यवस्थित घेता यावा म्हणून भव्य असे मैदान, मोटरसायकल, चार चाकी, रिक्षा, टेम्पो अशा वाहनांसाठी सप्ताह स्थळी येणाऱ्या सर्व रस्त्यांवर अलीकडेच अर्धा एक किलोमीटरवर पार्किंग व्यवस्था, जवळच एका मंडपात वेगवेगळ्या
दालनामध्ये रक्तदान कक्ष, आरोग्य कक्ष ,देणगी कक्ष, सुरक्षा कक्ष असे बनवण्यात आले आहेत. महाप्रसाद वाढण्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा याकडे मोठे लक्ष दिले जात आहे. नाशिक ,औरंगाबाद ,अहमदनगर आदी जिल्ह्यातील गावांमधून दररोज रिक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर मधून भाकरींचा प्रसाद तसेच मोठ्या संख्येने वारकरी भजन गात येथे येत आहेत. येथे प्रसिद्ध अशा आमटीचा प्रसाद बनवला जात आहे. अनेक साधुसंत, महंत, नेते विविध पक्षाचे कार्यकर्ते, विविध धर्माचे संत येथे भेटी देत आहेत. भाविकांची गर्दी वाढत आहे. प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पाऊस नसल्यामुळे चिखल व चिडचिड येथे दिसून येत नाही. येथे सप्ताह स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर स्वागताचे मोठमोठे फलक लावण्यात आलेले आहेत .तसेच सप्ताह स्थळाच्या परिसरात हार, प्रसाद, गळ्यातील माळा, खेळणी, मिठाई आदींची अनेक दुकाने थाटले आहेत. परिसराला यात्रेचे रूप प्राप्त झाले आहे. हरिनाम सप्ताहा बरोबरच कृषी प्रदर्शनाचाही मोठ्या संख्येने भाविक लाभ घेत आहेत. या हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी येथे लाखोंच्या संख्येने भाविक, महिला, वृद्ध ,लहान मुले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने गर्दीमध्ये मौल्यवान वस्तू, लहान मुले, मोटरसायकल, वाहने व्यवस्थित लॉक करून जबाबदारीवर पार्किंग करावीत. गर्दीत शांततेत , रांगेत दर्शन घ्यावे. शेवटच्या दिवशी गर्दीत शांततेत, काल्याचे किर्तन, महाप्रसादाचा, दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहनही सप्ताह कमिटीने केले आहे.
श्रीक्षेत्र पंचाळे येथे होणारा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी व रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरवा यासाठी महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प मधु महाराज, श्रीक्षेत्र पंचाळे व पंचक्रोशी तसेच सिन्नर तालुका, सप्ताह कमिटी, भाविक या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येत असून येथे जणू पंढरी अवतरल्याचे जाणवत आहे.