पुस्तक, ग्रंथ वाचता नाही आलं तरी चालेल पण माणसातील माणूसपण वाचता आलं पाहिजे– ह भ प कविताताई साबळे, ———————————— श्री साईसतचरित्र पारायण व हरिनाम सप्ताह सावळीविहीर बुद्रुक –किर्तन मालिका -पुष्प पाचवे
शिर्डी ( प्रतिनिधी)
पुस्तक, वृत्तपत्र,ग्रंथ वाचता नाही आलं तरी चालेल पण माणसातील माणूसपण वाचता आलं पाहिजे. असे सोनेवाडी येथील ह भ प कविताताई साबळे यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन मालिकेत पाचवे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या ,त्यांनी आपल्या कीर्तनातून अनेक दृष्टांत देत निरूपण करताना पुढे म्हटले की, या सृष्टीवर जाणण्या योग्य एकच आहे. ते म्हणजे देव आहे. आपण देवाशी जोडलं तर सर्व जग तुमच्या बरोबर येईल. देवाला साधलं तर सर्व काही प्राप्त होतं व हे करण्यासाठी, देव जाणण्यासाठी भक्ती मार्गच महत्त्वाचा आहे.
असे सांगत भक्ती मार्ग साधुसंता पासूनच दाखवला जातो. त्यासाठीच ही नारदाची गादी आहे. भगवंताचा निरोप पोहोचवण्याचे काम करण्यासाठी संत नारदाच्या या गादीवरून उपदेश करतात. मग या गादीवरून कीर्तन प्रवचन करताना महिला असो की पुरुष ते महत्त्वाचे नसून त्यांची पात्रता, त्याच्या तोंडातून निघणारे शब्द व अध्यात्मिक भक्ती ज्ञान चा उपदेश हा महत्त्वाचा आहे. असे सांगत अनेक दृष्टांत देत त्यांनी पुढे सांगितले की, जसा चलनावर शिक्का असतो , ब्रीद असते.तेव्हांच ते चलन स्वीकारले जाते, चालते, त्याचप्रमाणे आपल्या कपाळावर गळ्यात भगवंताचे ब्रीद, शिक्का असावा. गंध,माळ असावी, तरच देव आपल्याला स्वीकारतो. लग्न झाल्यानंतर पत्नीला आपण स्वीकारतो व आपलं सर्वस्व पत्नीचे होऊन जातं. तसंच ज्यावेळेस देव आपल्याला स्वीकारतो. देवाचं सर्व काही आपल्याला प्राप्त होऊन जातं पण त्यासाठी देवाला आपलंसं करा, भक्ती साधना करा. असे सांगत आपल्याला देवानं जतन केलं. तेव्हा आपला या जीवनातला वेळ व्यर्थ घालू नका, परमार्थी लावा, असे अनेक उदाहरणे, दाखले देत त्या पुढे म्हणाल्या की,आमच्या धर्मावर कोणी आक्रमण करत असेल तर स्वस्थ बसून जमणार नाही. त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण छत्रपती आहात, धर्म रक्षणासाठी आपल्या हातात टाळ ऐवजी तलवारच पाहिजे. असं सांगितलं होत. त्याप्रमाणेच आपणाला ही अशा प्रसंगा दरम्यान टाळ घेऊन जमणार नाही तर गांडीव सारखे धनुष्य घ्यावे लागेल व धर्म रक्षणासाठी पुढे यावे लागेल. असं त्यांनी म्हटलं. या कीर्तनाला गायनाचार्य ह भ प रावसाहेब महाराज वेताळ, किरण महाराज हारळे, सुरेश महाराज जपे, तर मृदंगाचार्य ह भ प संदीप महाराज वैद्य, यांच्यासह ह भ प मनोज बिडवे , संभाजी पा. जपे,गोरखराव जपे पा. रोहिदास जपे ,सुभाष पोपळघट, योगेश जपे, सचिन थोरात महाराज, सविताताई चव्हाण, बेबीताई सोनवणे आदी सर्व उपस्थित भजनी मंडळाचेही मोठे सहकार्य लाभले.
यावेळी सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने महिला भाविकांकडून त्यांचा कीर्तनाच्या शेवटी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ह भ प कविताताई साबळे यांच्या हस्ते या दिवशी पंगत देणारे अशोकराव पा. आगलावे व संजय ज्ञानेश्वर जपे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आशिष आगलावे व इतर परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गणेश कापसे यांनी हभप कविताताई साबळे यांचे अतिशय साध्या सोप्या भाषेत अध्यात्मिक उपदेश व प्रबोधन आपल्या कीर्तनातून केल्याबद्दल धन्यवाद मानले. या कीर्तनाला मोठ्या संख्येने महिला, पुरुष ,भाविक , ग्रामस्थ साई सेवा संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.