अखेर टाकळीभान सेवा संस्था खंडपिठाच्या जोखडातुन मुक्त
आठ वर्षांचा लढा, वादी राहुल पटारे यांच्या लढ्याला यश
टाकळीभान(सत्तेचा महासंग्राम)
गली आठ वर्षे न्यायाच्या दालनात प्रतिक्षेत असलेल्या टाकळीभान वि.वि.का.सेवा संस्थेची अखेर खंडपिठाच्या कचाट्यातून मुक्त झाली असुन संस्थेचे माजी चेअरमन वादी राहुल आप्पासाहेब पटारे यांच्या बाजुने खंडपिठाने बाहेरगावच्या सभासदांचे झालेले मतदान विचारात न घेता मुळ सभासदांचे झालेल्या मतदानाच्या आकडेवारी नुसार १३ सदस्यांच्या बाजुने निकाल दिला आहे.
टाकळीभान सेवा संस्थेची पंचवार्षिक सदस्य निवडणुक १० एप्रिल २०१६ रोजी झाली होती. तत्कालीन सत्ताधारी गटाने बाहेरगावच्या नात्या गोत्यातील व्यक्तिंना संस्थेचे सभासदत्व बहाल केल्याने निवडणुकी पुर्वीच वाद उपस्थित केला गेला होता. माजी चेअरमन राहुल पटारे यांनी याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाच्या निर्णया पर्यंत निवडणुक प्राधिकरणाने संस्थेचा निवडणुक कार्यक्रम सुरु केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने मुळ सभासद व बाहेरगावचे सभासद असे दोन वेगवेगळ्या मतपेट्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे व मतमोजणी न करण्याच्या सुचना निवडणुक प्राधिकरणाला दिल्या होत्या.त्यामुळे अंतिम निकाल दिला गेला नव्हता. त्यानंतरसुमारे एक वर्षानंतर १५ मार्च २०१७ रोजी खंडपिठाने दोन्ही मतपेट्यामधील मतदानाची मोजणी करुन निकाल जाहीर न करता खंडपिठाला अहवाल देण्याचे आदेश दिले होते.मात्र त्यानंतरही सुमारे सात वर्षे संस्थेच्या सभासदांना निकालाची प्रतिक्षा लागुन राहीली होती. दरम्यानच्या काळात संस्थेची निवडणुक लढवणार्या तीन सदस्यांचे निधन झाले आहे. या बाबतची खंडपिठात अंतिम सुनावणी ४ एप्रिल २०२४ रोजी पार पडली होती.
त्यानुसार खंडपिठाचे न्यायमुर्ती मेहेरे यांनी काल मंगळवारी बाहेरगावच्या सभासदांचे झालेले मतदान वगळुन मुळ सभासदांच्या मतपेटीतील झालेल्या मतदानावरुन जास्त मते घेणाऱ्या उमेदवारांची निवड घोषीत केली. त्यामध्ये याचिकाकर्ते राहुल पटारे यांच्या गटाचे अप्पासाहेब पांडुरंग कापसे ( मयत ), विजय दिनकर कोकणे, मंजाबापु धोंडीबा थोरात, एकनाथ पटारे, शिवाजी रामकृष्ण पवार, रोहीदास बोडखे, सौ, पुष्पलता भाऊसाहेब मगर हे सर्वसाधारण गटातुन तर महीला राखिव मतदार संघातुन सुनंदा भास्कर कोकणे, शांताबाई दत्तात्रय नाईक, अनु.जाती मतदार संघातुन देवदान लक्ष्मण रणनवरे, इतर मागास प्रवर्गातुन अविनाश लोखंडे तर भटक्या वि.जा.ज.मतदार संघातुन संगिता प्रकाश गायकवाड यांना विरोधी उमेदवारापेक्षा जास्तीची मते मिळाल्याने विजयी झालेले आहेत. या निवडणुकिसाठी मुळ सभासद संख्या १४१८ पैकि १२०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर बाहेरगावच्या ३९३ सभासदांपैकि २५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
गेली आठ वर्षे संस्था खंडपिठाच्या जोखडात आडकल्याने संस्थेवर प्रशासक राज सुरु होते. आता खंडपिठाने निकाल दिल्याने काही दिवसातच संस्थेचे कामकाज पुढील पाच वर्षासाठी सत्तेत येणार असल्याची माहीती याचिकाकर्ते राहुल पटारे यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे अॕड. महेश देशमुख, औरंगाबाद खंडपिठाचे अॕड. राहुल कर्पे, अॕड. शैलेश गंगाखेडकर यांनी कामकाज पाहीले तर अॕड. उमेश लटमाळे, अॕड. दिपक कोकणे व लिपिक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सहकार्य केले.
आठ वर्षानंतर लागलेल्या या निकालाचे माजी सभापती नानासाहेब पवार, मंजाबापु थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, चित्रसेन रणनवरे, रमेश धुमाळ, दत्तात्रय नाईक, शिवाजी धुमाळ, मधुकर कोकणे, भाऊसाहेब मगर, सुधिर मगर, रमेश पटारे, शंकर शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.
चौकट:- सोसायटीचा निकाल तर लागला मात्र चेअरमन व व्हाय चेअरमन पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र याबाबत स्थानिक नेते व संचालक मंडळाची लवकरच तातडीची बैठक होणार असून चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .