माजी सैनिक भोर हत्या प्रकरणात दोघांना अटक
प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक अंदाज
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल
लोहगाव (प्रतिनिधी) अहमदनगर परिसरात राहणाऱ्या मा.जवानाचा मृतदेह लोणी येथे रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने तोफखाना पोलीस स्टेशनला आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातील एका सायं दैनिकाच्या मालकासह दोघांना अटक केली आहे. मनोज मोतीयानी आणि स्वामी गोसावी असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
नगर परिसरातील बोल्हेगावमधील गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले विठ्ठल भोर हे सापडत नसल्याची तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केली होती. 29 तारखेला दुपारी चार नंतर त्यांचा फोन लागत नसून ते घरी आले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तोफखाना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. रविवारी दुपारी विठ्ठल भोर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणी तळेगाव रोडचा बाजूला गोगलगाव हद्दीत सापडला. मृतदेह पाहता क्षणी त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट दिसत होते.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनोज मोतीयानी याला अटक केली आहे. मोतीयानी हा अहमदनगर घडामोडी हे वर्तमानपत्र चालवितो. त्याशिवाय रिअल इस्टेट व इतरही व्यवसायात त्याचा सहभाग असतो. निवृत्त लष्करी जवान विठ्ठल भोर यांचा मोतीयानीशी संबंध काय? कशासाठी त्यांचा खून केला? खून प्रकरणात मोतीयांनी याचा संबंध कसा आहे? याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केला नाही.
दरम्यान गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोतीयानी आणि भोर यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद होता. दोघेही निंबळक शिवारात प्रॉपर्टी पाहण्यासाठी गेले होते. मनोज मोतीयानी सोबत स्वामी प्रकाश गोसावी हा देखील होता. तेथे त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी विठ्ठल भोर यांचा स्क्रू ड्रायव्हरने भोकसून खून करण्यात आला. भोर यांचा मृतदेह लोणी शिवारात टाकून मोतीयानी आणि गोसावी मध्यप्रदेशमध्ये पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून नाशिककडे येताना धुळ्याजवळ दोघांना ताब्यात घेतले.
नगर जिल्ह्यातील एका मान्यवर दैनिकाचा संपादक बाळ बोठे महिलेच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना आता सायं दैनिकाचा संपादक मनोज मोतीयानी देखील खून प्रकरणात तुरुंगात गेल्याने खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.