कर्तव्यात कसूर केल्याने व पाळीव प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने तहसीलदारांवर कारवाई करावी. – प्रहार चे ढूस यांची मागणी.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहुरी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे खोल पाण्यातून बैलांच्या साहाय्याने वाळू बाहेर काढून वाहतूक करण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याने वारंवार तक्रार करूनही राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत रजपूत यांनी वाळू तस्करांवर केवळ जूजबी कारवाई करून या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याने दोन मुक्या निष्पाप पाळीव प्राण्यांना /बैलांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याचे वृत्त सध्या वाचायला मिळत आहे. त्यामुळे राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत रजपूत यांचेवर कर्तव्यात कसूर केलेबद्दल व पाळीव प्राणी असलेल्या दोन बैलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या बद्दल राहुरीचे तहसीलदार चंद्रजित रजपूत यांचेवर कारवाई करून त्यांना राहुरीतून इतरत्र हलविणेत यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आ . प्राजक्तदादा तनपुरे, अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात ढूस यांनी म्हंटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात सध्या विविध ठिकाणी बेसुमार अनधिकृत गौण खनिज उपसा सुरू असल्याचे वृत्तपत्र तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीकडे राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत रजपूत हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे या राहुरीच्या तहसीलदारांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राहुरीच्या रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या मुळा नदीवरील रेल्वे पुलाखाली सुरू असलेल्या बैलगाडीच्या माध्यमातून पाण्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामध्ये दोन बैलांना नुकतीच जलसमाधी मिळाल्याचे वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले.
वरील सर्व घटना पाहता राहुरीच्या तहसीलदारांवर कोणत्याही वरिष्ठांचा वचक राहिलेला दिसत नाही. तसेच तहसीलदार चंद्रजीत रजपूत हे मालेगाव येथे तहसीलदार पदावर असताना वाळू वाहतूक विषयी त्यांना दंडित करण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे वृत्त वाचण्यात आल्याने असे तहसीलदार जर राहुरी तालुक्यात जास्त काळ राहिले तर राहुरी तालुक्याचा वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.
म्हणून विनंती की, वरील सर्व घटनाक्रम पाहता राहुरी तालुक्यात राजरोस अवैध गौण खनिज उत्खनन करण्यास राहुरीच्या तहसीलदारांना नक्की कोणाचा वरद हस्त आहे याची सखोल चौकशी करून राहुरीतील नगर मनमाड महामार्गाच्या मुळा नदीवर असलेल्या पुलाला त्याखाली झालेल्या बेसुमार अवैध वाळू उपशामुळे होणारा संभाव्य धोक्यास त्यांना जबाबदार धरावे तसेच राहुरी तालुक्यातील नागरिकांच्या फोनवरील तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गौण खनिज उत्खनन सुरूच ठेवलेबद्दल आणि अशा तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने दोन पाळीव बैलांच्या साह्याने सुरू असलेली पाण्यातील वाळू वाहतूक सुरूच राहिल्याने या दोन पाळीव बैलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना राहुरी तालुक्यातून इतरत्र हलविण्यात यावे ही विनंती.. असे निवेदनात शेवटी आप्पासाहेब ढूस यांनी म्हटले आहे.