हरेगाव घटनेतील दलित कुटुंबीयांना संरक्षण द्या
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
श्रीरामपूर— मानवतेला काळीमा फासणाऱ्या हरेगाव घटनेत दलित कुटुंबातील मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी केली आहे
दलित कुटुंबीयांची व पीडित मुलांची परिषदेचे राज्य कार्यकारी सदस्य अविनाश काळे, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, विशाल पंडित, फिलिप कदम, अनिल तपासे, डॉ. स्वप्नील भांबळ आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
भोसले पुढे म्हणाले की, हरेगाव येथील झालेल्या गंभीर घटनेतील कुटुंबीयांची भेट घेण्याची तत्परता राज्याचे मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री यांनी दाखवली नाही. ही राज्याच्या दृष्टीने अतिशय शरमेची बाब असून दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाचा कोणी वाली नाही असेच दिसून आले आहे. आपले संरक्षण आपणच करण्याची जबाबदारी आज आपल्या प्रत्येकावर आलेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजात ऐक्याची ताकद दिसून आली. हीच ताकद मनभेद, विचारभेद, मतभेद विसरून सर्वांनी मजबूत करणे गरजेचे असल्याचे अनिल भोसले व दीपक कदम यांनी यावेळी सांगितले.
दलित कुटुंबातील मुलांना अमानुषपणे मारहाण करून घृणास्पद वर्तन करणाऱ्या आरोपींना कुठल्याही प्रकारची दया माया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच अशा घटनांना कायमस्वरूपी आळा बसावा यासाठी ठाेस उपाययोजना होणे ही गरज आहे. सर्व जाती धर्माचे बांधव या देशांमध्ये गुन्हा गोविंदाने राहतात परंतु काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून अशा प्रकारचे कृत्य करून दहशत माजवण्याचा होत असलेला प्रकार थांबवावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जाती विध्वंसकतेचे प्रकार वाढत्या प्रमाणात वाढताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही