महात्मा गांधी संकुलात ‘विशाखा’ ची स्थापना
लोहगाव (वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने पारित केलेल्या परिपत्रकानुसार प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात प्राचार्य अंगद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाखा समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने विद्यार्थिनींच्या सुरक्षा तसेच लैंगिक अत्याचाराच्या कारणास्तव शाळा, महाविद्यालयातून या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या संकुलात उपप्राचार्य अलका आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या विशाखा समितीची स्थापना केली आहे. या विशाखा समितीच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि माता पालक यांचा संयुक्तिक मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या समितीच्या अध्यक्षा उपप्राचार्य अलका आहेर, सचिव दीप्ती रुपवते, शाहिस्ता शेख, हिरा चौधरी, संगीता खर्डे आदींच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अलका आहेर या होत्या. समिती सचिव दीप्ती रुपवते यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशाखा समितीचा उद्देश विशद केला. यावेळी शाहिस्ता शेख यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थिनींनी समस्या निर्माण करण्यापेक्षा त्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुलींचा कुटुंबात योग्य सुसंवाद असणे आवश्यक आहे. श्रीमती विजया गिरी यांनी विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबर स्वतःच्या प्रकृतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य अलका आहेर यांनी सांगितले की, विद्यार्थिनींनी सर्व समस्या आणि प्रसंगांना तोंड देण्यासाठी सक्षम असायला हवे. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना हिंमतीने तोंड दिल्यास समस्या निर्माण होणार नाहीत.
याप्रसंगी चेतना पाटील, अनिता तांबे, राजश्री कारंडे, अर्चना शेळके, सविता सभादिंडे, रुक्सार तांबोळी, प्रियंका लोंढे, योगिता निघुते, संकिता पगार, शितल काकडे, नीता शेटे, वनिता तांबे, शिल्पा राऊत, माधुरी पानगव्हाणे, सोनम चव्हाण, अंजुम तांबोळी यांच्यासह विद्यार्थिनी आणि माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर शेवटी सुवर्णा भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
.