गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे … विठ्ठलराव शेळके
राहाता (वार्ताहर)
गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेतीस पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे
उपअभियंता, गोदावरी उजवा तट कालवा, राहता यांना दिलेल्या निवेदनात विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देतो की, दारणा धरण समूहात जवळजवळ 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. कालवा लाभ क्षेत्रात यावर्षी जून महिन्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके सोयाबीन, मका, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. शिवाय शेतात चारा पिके, फळबागा, ऊस इत्यादी पिके उभी आहेत. जवळजवळ एक महिन्यापासून पाउस उघडला असल्याने शेतातील उभी पिके जळू लागली आहे. तरी तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडून उभ्या पिकांना सात नंबर फॉर्मवर पाणी द्यावे तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत दहापट वाढ केली आहे. सन 2018-19 यासाठी बारामाही पिकांसाठी पाणीपट्टी दर स्थानिक करासह 538 रुपये होते नवीन दरवाढीप्रमाणे एकरी 5443 रुपये नवीन पाणीपट्टी दर असतील यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतमाल सोयाबीन, कांदा व इतर पिकाची निर्यात बंदी केल्यामुळे कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्यात पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत मोठी वाढ केल्याने पाटपाणी कसे घ्यावे? अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे. नवीन पाणीपट्टी दर खरीप पिकासाठी 1890 रुपये आणि रब्बीसाठी 3680 रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात दुष्काळामुळे पिके जळून गेली आहे तरी यावर्षी खरीप व रब्बी हंगामात किमान दोन दोन आवर्तने व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीची बैठक ही राहाता पाटबंधारे विभागात घेऊन लाभक्षेत्रातील शेतकरी यांना निमंत्रित करून नियोजन करण्यात यावे तसेच आता कुठलेही वाट न पाहता शेतातील खरीप पिके, ऊस, फळबागा यांना तातडीने आवर्तन सोडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकरी या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडतील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे
पत्रकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे, राजेंद्र गोर्डे. भाऊसाहेब एलम, दादासाहेब गाढवे, हौशीराम चोळके, पुंजाराम आहेर, मीनानाथ पाचरणे, सावळेराम आहेर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.