Breaking
ब्रेकिंग

आषाढी कामिका एकादशीनिमित्त ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक अशा श्रीक्षेत्र पुणतांब्याला लाखो भाविकांची मंदीयाळी! पवित्र गोदास्नान आणि श्री पांडुरंगाच्या व संत योगीराज चांगदेव महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली ही पुण्यनगरी!

0 9 1 3 8 0

 

 

पुणतांबा(राजकुमार गडकरी)–

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे प्रति पंढरपूर व दक्षिण काशी संबोधले जाणारे व ऐतिहासिक ,धार्मिक, पौराणिक दृष्टीने मोठे महत्वाचे तीर्थस्थान असणारे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पवित्र अशा गोदामाईच्या किनारी वसलेले श्रीक्षेत्र पुणतांबा या पुण्य नगरीमध्ये आषाढ महिन्यातील कामिका एकादशीला संत योगीराज चांगदेव महाराज यांची दरवर्षी मोठी यात्रा भरते. यावर्षी बुधवार 31 जुलै 2024 रोजी कामिका एकादशी असून पुणतांबा नगरी पांडुरंगाच्या व योगीराज संत चांगदेव महाराजांच्या जय जय काराने दुमदुमून गेली आहे. अनेक दिंड्या व हजारो वारकरी, भाविक येथे दर्शनासाठी आले आहेत. पवित्र गोदा स्नान व दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

असे हे श्री क्षेत्र पुणतांबा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. श्रीक्षेत्र पुणतांबाचा इतिहास मोठा आहे.या गावाचे नाव पूर्वी पुण्यस्तंभ, तांब्याची नगरी, अथवा पुण्यनगर असे होते. असे म्हणतात.ही राजा विक्रमादित्याची राजधानी होती असेही म्हटले जाते. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. वेशीत तेथे श्री मारुती मंदिरे आहेत. पण आता बऱ्याच ठिकाणी हि तटबंदी ढासळली आहे. असे दिसते.विक्रमादित्य राजाने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालखंड पुणतांबा येथे व्यतीत केला. असे म्हणतात.महायोगी चांगदेव महाराजांची समाधी येथे आहे. श्री योगीराज संत चांगदेव महाराजांना आपल्या विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीस गेले व तेथे गर्वहरण होऊन परतले. ती कथा प्रसिद्ध आहे. संत चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताईला गुरू केले. त्यांनी चौदाशे वर्षें घोर तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे गोदातीरी संजीवन समाधी घेतली. आज येथे सुंदर असे योगीराज संत चांगदेव महाराज संजीवन समाधी मंदिर आहे.

वैदिक काळात पुणतांबा येथे गोदावरीकाठी ऋषिमुनी तप:श्चर्या करत व मोक्षप्राप्तीसाठी पुणतांबेगावी वास्तव्य करत. पुरातनकाळी हे गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते. गावात बहुतांश वस्ती ब्राह्मणांची होती. गावातील बहुतांश वाडे ब्राह्मणांचेच आहेत. पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्ती यासाठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई. पुणतांबा येथे गोदावरी उत्तरदक्षिणवाहिनी होते. म्हणून पुणतांबाला दक्षिण काशी ही संबोधले जाते. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचेही पुणतांबा गावी काही काळ वास्तव्य होते. स्वामींच्या अनुयायांनी गोदाकाठी चक्रधर स्वामींचे भव्य मंदिर बांधले आहे. पुणतांब्याचे धार्मिक महत्त्व ओळखून दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरू गंगागीर महाराज आषाढी एकादशी व महाशिवरात्र या दोन दिवशी पुणतांबा येथे जात. तेथूनच त्यांच्या हरीनामसप्ताहाचा आरंभ झाला. आज संत सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह देशात नव्हे जगात सर्वात मोठा हरिनाम सप्ताह समजला जातो. पुणतांबा येथूनच नामसप्ताहाचे आयोजन करणाऱ्या गावाचे नाव जाहीर करण्याची व त्यांना या आषाढ कमिका एकादशीला रीतसर नारळ देण्याची परंपरा सुरू आहे. यावर्षी हा हरिनाम सप्ताह सिन्नर तालुक्यातील पंचाळे पंचक्रोशीत होणार आहे . असे समजते.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी पुणतांबेगावी अनेक वर्षें वास्तव्य केले व येथील काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही तेथे धार्मिक विधी व्यवस्थितपणे पार पाडता यावेत. यासाठी गोदावरी नदीकाठी घाट बांधला. तो घाट सुस्थितीत आहे. अहिल्यादेवींनी येथे वाडाही बांधला होता. हा वाडा मात्र पडक्या अवस्थेत आहे. येथे महाशिवरात्र व आषाढी कामिका एकादशी या दिवशी यात्रा भरते. शिर्डी-पुणतांबा रेल्वेमार्ग उपलब्ध झाल्याने व आता शिर्डी मुळे पुणतांबा जंक्शन झाल्यामुळे पुणतांबा या धार्मिक स्थळाचे नावही शिर्डीप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशात गेले आहे.

संत योगीराज चांगदेव महाराजांनी ज्यांना गुरू केले त्या मुक्ताईचे मंदिर संत चांगदेव महाराज समाधीजवळ असावे या धारणेतून महंत रामानंदगिरी यांनी दोन वर्षांपूर्वी मुक्ताई मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते, ते पूर्ण झाले आहे. तसेच, आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी मुक्ताई मठाची स्थापना करण्यात आली आहे.

भगवान शिवशंकराकडून वरदान मिळवून त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला. म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली. पुणतांबेगावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृत्तिका महोत्सव साजरा केला जातो. मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहीत केले जातात. कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमेला मंदिरात जप-तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते. त्यादिवशी मध्यरात्री नदीचे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ होते व कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना या मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिकस्वामींना नारळ, मोरपीस, रूद्राक्ष, सोने, पिवळे जानवे, तीळ, मूग वाहून प्रसन्न केले जाते. कृत्तिका नक्षत्रावर मंदिरात होणाऱ्या कृत्तिका महोत्सवास लाखो भाविक कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात.

कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या त्या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिरात मध्यभागी शंकराची पिंड असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती, उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे. तर मंदिराच्या चारही बाजूंला भगवान शंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूंला नवग्रहांचे मंदिर आहे.

पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाच्या मुलाला जलोदर हा पोटाचा आजार झाला. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण आजार बरा होईना. त्यावर उपाय म्हणून गावाच्या कडेला यज्ञ करून त्यात एका बालकाचा बळी द्यावा, त्यामुळे आजार बरा होईल असे सांगण्यात आले. राजाने यज्ञाची तयारी केली पण बळी देण्यासाठी मुलगा मिळेना, म्हणून मग दवंडी देण्यात आली. तेव्हा शेजारी असलेल्या पुरणगावातील मुद्गल गोऱ्हे नामक मुलगा घरची हलाखीची परिस्थिती ध्यानी घेऊन बळी जाण्यास तयार झाला. धार्मिक विधीनंतर मुलास यज्ञात टाकले जात असताना यज्ञकुंडात देवी प्रकट झाली व देवीने त्या मुलास वरचेवर झेलून यज्ञाबाहेर सोडून दिले. देवीने बळी जाणाऱ्या मुलाला वर सोडून दिले, त्यामुळे त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुढे यज्ञातून जीवदान मिळालेल्या मुद्गलाने त्याच गावात आश्रय घेतला. त्याला एकशेचाळीस वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने देवी मंदिरापासून काही अंतरावर समाधी घेतली. देवी मंदिराशेजारी सुरेख असे मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर आहे.

तसेच पुणतांबा गावात प्रसिद्ध अशी श्री खंडोबारायांची तलवार असून तिची चंपाषष्टीला सम्पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येते.

तसेच या पुणतांबा गावाचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री काळभैरवनाथ मंदिर गावात असून तिथेही जत्रा भरविण्यात येते.व आषाढी कामिका एकादशीला योगीराज संत चांगदेव महाराजांची यात्रा भरवली जाते.असे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक असलेले हे पुणतांबा तीर्थक्षेत्र असून येथे बुधवार 31 जुलै 2024 रोजी आषाढी कामिका एकादशीला यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले आहेत .पुणतांबा नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.

आषाढ महिन्यातील देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपुराची यात्रा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठी यात्रा भरते. या एकादशीला खुद्द पांडुरंग पुणतांबाला येतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्री विठुरायाच्या दर्शनाला लाखोच्या संख्येने या एकादशीला भाविक पुणतांबात दाखल झाले असून दर्शनासाठी मोठी रांग पहाटेपासूनच लागल्याचे दिसत आहे. श्रीक्षेत्र पुणतांबा येथे भरणाऱ्या यात्रेनिमित्त व एकादशी निमित्त येथे दर्शनासाठी अहमदनगर जिल्ह्यातूनच नव्हेतर नाशिक, औरंगाबाद व विविध जिल्ह्यातून, गावातून पायी दिंड्या, पालख्या पुणतांब्याला येतात. हजारो वारकरी हातात भगव्या पताका ,झेंडे, टाळ, महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, मुखाने हरिनामाचा गजर करत ,भजन गात, पावसाच्या रिमझिमची तमन्ना न बाळगता नाचत, उड्या मारत, फुगड्या खेळत पुणतांब्याला येऊन आपल्या पांडुरंगाचे व संत योगीराज चांगदेव महाराजांचे समाधी दर्शन घेतात. अनेक दिंड्या यावर्षी एकादशीच्या आदल्या दिवशीच पुणतांब्यात दाखल झाले आहेत . रात्री कीर्तन प्रवचन , महाप्रसाद त्याचप्रमाणे आज एकादशीला ठिकठिकाणी चहा फराळाचा कार्यक्रम होत आहे. अनेकजण पंढरपूरची वारी केल्यानंतर पुणतांब्याची वारी करतात. येथे रेल्वेने तसेच एसटी बसने व विविध खाजगी वाहनातूनही मोठ्या संख्येने भाविक यात्रेनिमित्ताने आले आहेत. संपूर्ण पुणतांबा नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. श्री संत योगीराज चांगदेव महाराजांच्या मंदिर परिसरात इतरही अनेक देवदेवतांची मंदिर आहेत. तेथेही दर्शनासाठी गर्दी दिसत आहे. या मंदिर परिसरात हार, प्रसाद, खेळणी, मिठाई, आदींची अनेक दुकाने थाटली आहेत. राहट पाळणे आले आहेत. फळांची दुकाने लागली आहेत. दर्शना अगोदर गोदा स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे .दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचेही निदर्शनास येत आहे. सुरक्षेसाठी शिर्डी, राहता पुणतांबा येथील पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे. त्याचप्रमाणे पुणतांबा व परिसरातील ग्रामस्थही यात्रेचे व्यवस्थित नियोजन करत आहे. येथील मंदिराचे ट्रस्टी ही रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. ठिकठिकाणी एकादशी असल्यामुळे चहा,केळी, फराळ, प्रसाद म्हणून मोफत वाटण्यात येत आहे. यात्रेनिमित्ताने एसटी महामंडळाने पुणतांबा साठी श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर आदी बस आगारातून जादा बसेस सोडल्या आहेत. एकूणच आज कामिका एकादशीला पुणतांबा नगरी भक्ती भावात नाव्हून गेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे