श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन
श्रीरामपूर:(सत्तेचा महासंग्राम न्युज)
वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त शाळेपासून ते गावातील महादेव मंदिरापर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्धवराव पवार आणि मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांच्या हस्ते पालखीतील श्रीविठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांनी विद्यार्थ्यांना दिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. या दिंडी बरोबरच वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा तसेच ग्रंथ आपले गुरु अशा घोषणा तर विठ्ठल विठ्ठल नामघोष करत दिंडी निघाली. झांज पथकाने दिंडीचे नेतृत्व केले. या दिंडीमध्ये श्रीविठ्ठल ,रखुमाई तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. दिंडीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या. श्रीविठ्ठल रखुमाईचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. वारकऱ्यांच्या वेषात आलेल्या विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद लुटला. पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन टाळ वाजवत भजने म्हटली. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका निंभोरे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून राजगिऱ्याचे लाडू देण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रज्ञा कासार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कासार, स्वेजल रसाळ, उषा नाईक, संतोष नेहूल, भास्कर सदगीर, दिपाली बच्छाव, अविनाश लाटे, सुनीता बोरावके, प्रशांत बांडे, अशोक पवार, संदीप जाधव व भास्कर शिंगटे हे उपस्थित होते.