सावळीविहीर येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या! तर तीन जण गंभीर जखमी! सासुरवाडीत जावयाने केले हत्याकांड! आरोपी यास नाशिक मधून पोलिसांनी केले जेरबंद!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
शिर्डी (डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
राहाता तालुक्यातील शिर्डीजवळ असणा-या सावळीविहीरवाडी येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीत असलेल्या पत्नीसह इतर पाचजणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजीसासू हे जागीच ठार झाले. सासू, सासरे आणि मेहुणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हा हल्ला करणारा आरोपी सुरेश विलास निकम आणि रोशन कैलास निकम हे पळून चालले होते. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस व अहमदनगर एलसीबी टिम’च्या मदतीने घटना घडल्यानंतर पाच तासात अटक केली आहे. आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम व रोशन कैलास निकम यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 864/ 2023 भादवि कलम 302 /360 /506/ 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, “शिर्डीजवळील सावळीविहीरवाडी येथे हे गायकवाड कुटुंब राहते. चांगदेव गायकवाड यांचे जावई सुरेश विलास निकम आणि त्यांचे नातेवाईक रोशन कैलास निकम (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) हे दोघेजण रात्री अकरा वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथील सासुरवाडी येथे आले. घराचा दरवाजा उघडताच या दोघांनी घरातील सहा नातेवाईकांवर चाकूने बेछूट हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरेश निकमची पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजी सासू हिराबाई गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला तर सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड आणि मेहुणी योगिता जाधव हे तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके तसेच पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे घटनास्थळी पोलीस पथकासह दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवली
हल्ला केल्यानंतर दोन्हीही आरोपी नाशिकच्या दिशेने पसार झाले होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा व शिर्डी पोलिसांचे मिळून चार पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आली. दरम्यान आरोपींचे लोकेशन मिळाल्यानंतर व ते नाशिककडे असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांना याबाबतची माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी तातडीने पावले उचलत नाशिक-पुणे रोड वरील शिंदे गाव टोल नाक्याजवळ सापळा रचून मोटारसायकल वरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतले.
या दोघांनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह नाशिक रोड येथे पोहचत, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना घटनास्थळी आणण्यात आले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.एकाच कुटुंबातील सहा जणांवर हल्ला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत आहेत त्यामध्ये आरोपी सुरेश निकम याचे सासू-सासरे हे गंभीर असल्याचे समजते. आरोपी सुरेश निकम हा संगमनेर खुर्द येथील रहिवासी असून तो हमाली व इतर किरकोळ काम करत असल्याचे समजते. दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अति. पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अमंलदार तसेच शिर्डी पोलिसांनी सदरची कारवाई केली.