एकनिष्ठा ठेवून भक्ती मार्गानं चाललं तर नक्कीच परमार्थ साध्य होतो, पण त्यासाठी खरा भक्ती मार्ग हे साधुसंत, सद्गुरूच दाखवू शकतात—ह भ प निलेश महाराज निकम (विंचूर) श्री साई सत चरित्र पारायण व हरिनाम सप्ताह वर्ष 21वे किर्तन मालिका -पुष्प सहावे.
शिर्डी ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
आपल्या पतीवर संपूर्ण निष्ठा ठेवून जी पत्नी आपल्या पत्नीव्रतात वागते,ती पतीव्रता असते व अशा पतिव्रतेला इतर काहीही साध्य करण्याची गरज पडत नाही. तिला सर्व काही साध्य होते. त्याचप्रमाणे भक्तांनी परमेश्वरावर एकनिष्ठा ठेवून भक्ती केली तर त्यास सर्व काही साध्य होते. एकदा देवाला साध्य केलं तर सर्व काही मिळतं. नंतर काहीही साध्य करण्याची गरजच पडत नाही. पण त्यासाठी सर्वस्व निष्ठा महत्त्वाची आहे. असे ह भ प निलेश महाराज निकम ( विंचूर) यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन मालिकेत सहावे पुष्प गुंफताना ते रविवारी आपल्या कीर्तनातून निरूपण करताना बोलत होते.
यावेळी निलेश महाराज निकम पुढे म्हणाले की, एखादी विवाहिता आपल्या माहेरी चालली तर ती मोठ्या आतुरतेने पुढे पाहत राहते. हे गाव आलं, दुसरं गाव आलं, आता आपलं माहेर येईल. या आशेने ती मोठ्या उत्कंठेने समोर बघत असते. त्याच आशाने, निष्ठेने आपण भक्ती मार्गाच्या एकेक टप्प्याने पुढे पुढे पाहत चालले पाहिजे. भक्ती मार्गाचा एक एक टप्पा सर केला पाहिजे. तेव्हा देवाला साध्य करता येते. एकदा देवाला साध्य झाले की सर्व काही साधकाला प्राप्त होते.
देव सगळ्यांनाच आवडतो . मात्र एकच देव सर्वांना आवडतो असे नाही, प्रत्येकाला वेगवेगळे देव आवडतात. श्री विठोबा, खंडोबा,म्हसोबा ,बिरोबा,असे जरी प्रत्येकाला वेगवेगळे देव आवडत असले तरी एकाच देवावर संपूर्ण निष्ठा ठेवून भक्ती केली पाहिजे. तेव्हा देव प्रसन्न होतो. जर आपण एखाद्यावर निष्ठा, दुसऱ्या देवाची भक्ती, तिसऱ्या देवावर भाव ठेवला तर लवकर हवं ते साध्य होत नाही. त्यासाठी आपल्याला जे आवडते त्यावरच आपण संपूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे .दुसरा कोणी सांगतो म्हणून आपली आवड बाजूला ठेवून त्याच्या आवडीने वागणे म्हणजे आपल्यासारखा बिनडोक कुणी नाही. जर आपण दुकानातून आपणास आवडलेला शर्ट विकत घेतला .मात्र दुसऱ्याला तो आवडला नाही. त्यामुळे आपण तो अंगात परिधन केला नाही. तर ते सांगणाऱ्यापेक्षा आपणच बिनडोक ठरतो. असे अनेक वेगवेगळे दृष्टांत देत त्यांनी कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचे सविस्तर व साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करीत उपस्थितांना उपदेश केला. यावेळी ते पुढे म्हणाले की, जी स्त्री आपल्या पतीला रागानं यांना डोकंच नाही असं म्हणते, मग त्यांना डोकं नाही तर लग्न केलेली ती स्त्री बिनडोक नाही का? असा सवाल विचारत आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण आपलं कर्म करत राहणं हे महत्त्वाचे आहे. ज्या घरामध्ये सासू सुनेला दिवसातून दोन वेळेस रडवते, जिच्यापासून आनंदच मिळत नाही अशी ननंद असते, पतीला चला वेगळे राहू असं जी जाऊ म्हणते त्या घरात कधीही आनंद मिळत नाही. व काहीही साध्य होत नाही. त्यासाठी घरातील सर्व चांगले व संस्कारमय सदस्य असायला हवेत. तसंच या विश्वरूपी घरात परमेश्वराला साध्य करण्यासाठी भक्तीमार्गातही ज्ञानवंत, भक्तीवंत , सद्गुरु असायला हवेत. भक्ती मार्गाने आपल्याला देवापर्यंत पोहोचायचे असेल तर सद्गुरु, साधुसंताकडुन, ज्ञानवंतांकडून खरीदिशा घेतली पाहिजे.घरामध्ये मुलांवर संस्कार करण्याचे मोठ काम आईच असतं. तसंच भक्ताला भक्तिरसात आणण्याचे काम सद्गुरू साधू संतांचा असतं.
कीर्तनानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे व महेश नवनाथ जपे यांनी महाराजांचा सत्कार केला. तर या दिवशी महाप्रसादाची पंगत देणारे बाळासाहेब जनार्धन जपे यांचे बंधू संजय जनार्दन जपे व सतीश तुकाराम जपे यांचे बंधू पुंजाहारी (किरण)तुकाराम जपे यांचा महाराजांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश कापसे व गणेश आगलावे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक , महिला भजनी मंडळ,उपस्थित होते. कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.