संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण! जीवनात सगळं हरलं असेल तरी हिंमत हरू नका कारण हीच हिम्मत विश्व निर्माण करण्याची देते प्रेरणा! —-ह भ प उत्तम महाराज गाढे
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
या संसाररूपी भवसागरात तरायचे असेल तर परमेश्वराच्या नामस्मरणानेच आपण सहज तारून जाऊ शकतो. कारण नामस्मरणात तेवढी मोठी ताकद आहे. असे पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे हभप उत्तम महाराज गाढे यांनी आपल्या सुश्राव्य अशा कीर्तनातून उपस्थितांना प्रबोधन करताना सांगितले .
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील 21 व्या श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन मालिकेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते,यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनातून अध्यात्मिकतेबरोबरच समाज प्रबोधन करताना अनेक उदाहरणे, दाखले देत सांगितले की, राम सेतू बांधताना सागरातील पाण्यात रामनामाचे टाकलेले दगड तरंगले. एवढी नामस्मरणामध्ये किंवा नामामध्ये शक्ती आहे. भगवंताचं नामस्मरण करा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा संसार साधा होता पण त्यांच्या अखंड नामस्मरणाने त्यांना मोठी अध्यात्मिक ताकत मिळाली होती. ते त्यातून काहीही करू शकत होते. त्यामुळेच तीन अक्षरी असणारा विठ्ठल नामाचा मंत्र प्रत्येकाने या जीवनात जपला पाहिजे. नामस्मरण केले पाहिजे.असे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.परमार्थाचा संचय महत्त्वाचा आहे, तो करणे गरजेचे आहे. त्यासाठी जीवनात कासवाच्या गतीने का होईना पण नामस्मरण महत्त्वाचे आहे. संत गोरोबाचं लेकरू नामस्मरणामुळेच परमेश्वराने चिखलातून काढलं. भीष्म प्रतिज्ञा होऊनही पांडवांना भगवंतांनी वाचवलं, एवढी ताकद या नामस्मरणात आहे, योग,याग त्यापेक्षा नामस्मरण साधे ,सोपे आहे. पारायण ,प्रवचन, कीर्तन परंपरा सुंदर आहे.असे सांगत आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात आप वायू पृथ्वी अग्नी आकाश मन बुद्धी चंद्र सूर्य तारे व आत्मिक परमात्मा असे १३ साक्षीदार आहेत. त्यामुळे आपण काय करतो हे इथे पुरावे नष्ट केले, डिलीट केले तरी या तेरा साक्षीदारांकडून ते सुटत नाही. त्यासाठी जीवनात चांगले विचार, चांगले संस्कार ,आचार हे महत्त्वाचे आहे व तेच बरोबर येणार आहे. त्यासाठी वडिलांकडून संघर्ष व आईकडून संस्कार शिका, संतांचे विचार घ्या, व ते आचरणात आणा, आयुष्य काय असतं हे कोणतीही डिग्री शिकवू शकत नाही, मात्र लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक ते शिकून जाते. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास फुग्यात भरून विकतो, त्याला विचारा आयुष्य काय असते! जो पोटासाठी दिवसभर कष्ट करतो. त्याला या जीवनातील आयुष्याचे महत्त्व कळते. म्हणून ज्या वृक्षाने सावली दिली तिला विसरू नका, ज्याने जीवनात आधार दिला त्याला आधा करू नका, धन कमवताना चांगल्या मार्गे कमवा, खिशात लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्यात एक रुपयाचाही गरिबांचा तळतळाट नसावा, कारण तो तळतळाट सुखात जगू देत नाही, असे सांगत कोणीही धनसंपत्ती बरोबर नेत नाही, खरी संपत्ती जमा करायची असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा, कपडे स्वच्छ असो वा नसो पण माणसाचं मन स्वच्छ असायला पाहिजे, स्वच्छ कपड्याची लोक स्तुती करतात पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो, चांगलं कर्म करणारा कधीही तुकाराम गाथेप्रमाणे बुडत नाही तो तरुण जातो. जीवनात सगळं हरलं तरी चालेल पण हिम्मत कधी हारू नका ,कारण तीच हिम्मत तुम्हाला विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यामध्ये जिद्द असते, तोच खरा कर्तृत्ववान माणूस असतो. स्वतःला घडविण्यासाठी वेळ द्या, म्हणजे दुसऱ्याला दोष देण्यासाठी आपणाला वेळ मिळणार नाही, जीवन चांगले जगायचे असेल तर विचार चांगले असले पाहिजे, विचार चांगले असले तर संगत कोणाचीही असली तरी मनुष्य बिघडत नाही. रावणाच्या राज्यात बिभीषण असतानाही बिघडला नाही तर रामराज्यात कैकई असूनही सुधारली नाही, असे सांगत आपल्या विचारावरच परिस्थिती अवलंबून असते ,दिशा बदला आपोआपच दशा बदलते, असे सांगत मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले विचार, संस्कार द्या ,नुसतीच संपत्ती कमवून ठेवू नका, कारण ती संपत्ती संस्कारशून्य असा मुलगा निघाला तर एका दिवसात ती विकून टाकेल, त्यासाठी मुलांना शिक्षण ,संस्कार ,चांगले विचार व संपत्ती कमावण्याची ताकद त्यांच्यात निर्माण करा,असे सांगत आंधळ्याला आरशाची तर बहिऱ्या माणसाला संगीताची काही किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्याची काहीच किंमत नसते, अशा माणसापासून जपून राहावे लागते. जो व्यक्ती आपल्या प्रगतीवर जळतो त्याचा कधी तिरस्कार करू नका, कारण तो आपली प्रगती पाहूनच जळत असतो, कुणी कसाही वागला तरी आपण चांगले वागा ,त्यामुळे वाईटातला वाईट माणूस चांगला वागू शकेल, असे सांगत देव हसू देत नाही व रडूही देत नाही, लाखो रुपयांचे घड्याळ आपल्या हातात असले तरी ते बंद पाडायची ताकद ईश्वराची आहे. आपण दहा साखर कारखान्यांचे शेअर्स विकत घेऊ शकतो पण शुगर झाली तर साखर खाऊ शकत नाही , दहा लाखाचा दिवान घेऊ शकतो पण मणक्याचा आजार असला तर डॉक्टरच चटईवरवर झोपा असे सांगतात, काहींना तर पंचतारांकित हॉटेलला जाऊनही शारीरिक व्याधीमुळे तेथील मसालेदार तेलकट चवदारपदार्थ खाता येत नाही, त्यासाठी चांगले संस्कार आचार विचार आहार महत्त्वाचे आहे व त्याचबरोबर नामस्मरण गरजेचे आहे.त्यामुळे या जगाच्या मालकाचे म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे हेच या संसार रुपीभवसागरातून तरुण जाण्याचा एक मार्ग आहे. असे त्यांनी सांगितले. ह भ प उत्तम महाराज गाढे यांचा कीर्तनानंतर महाप्रसादाची पंगत देणाऱ्या खान वसाहतीचे आगलावे पाटील, काशीद पाटील, थोरात पाटील यांनी सत्कार केला. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.