शिर्डीच्या साई संस्थांनला दि. 20 ते 22 जुलै या गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत सुमारे सहा कोटी 26 लाख रुपये देणगी झाली प्राप्त!!
शिर्डी (राजकुमार गडकरी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दि.२० जुलै ते सोमवार दि.२२ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये ०६ कोटी २५ लाख ९८ हजार ३४४ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. सदर देणगी मध्ये रोख स्वरुपात रुपये ०२ कोटी ५३ लाख २९ हजार ५७५ दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर ०१ कोटी १९ लाख ७९ हजार १९० रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास ४६ लाख ७३ हजार ४००, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०१ कोटी ९५ लाख १३ हजार ८८४ रुपये, सोने १२२.५०० ग्रॅम रक्कम रुपये ०८ लाख ३१ हजार ३८८ व चांदी ४,००४.६०० ग्रॅम रक्कम रुपये ०२ लाख, ७० हजार ९०७ यांचा समावेश आहे.
श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः ०२ लाखहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ९१ हजार ३४९ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ९६ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ६२ लाख ३१ हजार १२५ रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. उत्सवा दरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारण ५८१० साईभक्तांनी उपचार घेतले तसेच २०५ साईभक्तांनी रक्तदान केले असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.