काचोळे विद्यालयाने आषाढी एकादशी निमित्त काढली गुणवत्ता वारी.
वारीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासमवेत सत्कार.
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त गुणवत्ता वारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाने झांज पथक, ढोल पथक व लेझीम पथक यांच्या गजरात स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली. या रॅलीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील, माजी पर्यवेक्षक शशिकांत दहिफळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर ,ज्येष्ठ शिक्षक संतोष सोनवणे आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वारीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा, वारकऱ्यांच्या वेशभूषा, करून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मीनाताई जगधने म्हणाल्या की, काचोळे विद्यालयाने श्रीरामपूर शहरामध्ये आगळा वेगळा उपक्रम राबवला असून आषाढी एकादशी निमित्त गुणवंतांचा गुण गौरव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले की, गुणवत्ता शिस्त व संस्कार ही काचोळे विद्यालयाची ओळख आहे. याच बरोबर विद्यालय महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती व परंपरा जोपासत आहे. याचबरोबर संस्कृतीचा वारसाही विद्यालयाने जोपासला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या संत लोकांची वेशभूषा, वारकऱ्यांची वेशभूषा, विठ्ठल रखुमाई बघून पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांनाच मिळाला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सुमारे पंधराशे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत विद्यालयाची शिस्त व संस्कार याचे कौतुक केले. पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केल्यामुळे वारी यशस्वी संपन्न झाली.