सावकारांना कंटाळून व्यवसायिकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
टाकळीभान( प्रतिनिधी )
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे व्याजाने घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही सावकाराकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या त्रासाला कंटाळून येथील मेडिकल व्यावसायिक विशाल विठ्ठल हळनोर (वय ३१) यांने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर मेडिकल चालकावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की टाकळीभान येथे विशाल विठ्ठल हळनोर (वय ३१)राहणार खिर्डी या तरुणाचे टाकळीभान येथे मेडिकल दुकान आहे. तो खिर्डी येथे पत्नी, मुलगा, आई ,वडील चुलते यांच्याबरोबर एकत्र कुटुंब करून वास्तव्यास आहे. मेडिकल व्यावसायिक विशाल हळनोर यांने टाकळीभान येथील काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे घेतलेल्या सावकारांना व्याजापेक्षाही जास्त पैसे दिले परंतु तरीही व्याजा वाल्यांकून त्याला सततचा तागादा व त्रास सुरू होता. एका सावकाराने व्याजा चे पैसे देऊनही हळनोर याच्या मेडिकल गाळ्याची नोटरी बळजबरीने करून घेतली असे विशाल हळनोर यांने आपल्या वडिलांना व चुलत्याला लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच सावकाराच्या व्याजाच्या पैशाला कंटाळून आपण आपला जीव देत आहोत असे चिठ्ठीत स्पष्टपणे त्याने म्हटलेले आहे. सदर घटना घडल्यानंतर त्या दिवशी विशाल हळनोर यास रात्री 11 वा. श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत विशाल हळनोर यांच्या नातेवाईकांनी अशी माहिती दिली की विशाल याने साधारणपणे ३० ते ३५ लाख रुपये वेगळ्या सावकाराकडून कर्ज घेतल्याचे समजते. मात्र त्यांचे पैसे परत देऊनही ४०-५० लाख रुपये देणे सावकारांनी परत काढले. एका सावकाराकडून १४ लाख रुपये त्याने घेतले होते त्याला ३१ लाख रुपये परत दिले, तरी तो अजूनही पैसे मागत आहे.तसेच एकाने तर टाकळीभान मधील गाळ्याची नोटरी लिहून घेतली आहे व सगळे सावकार अव्वाच्या सहावा व्याज आकारून पैशाची मागणी करत आहेत. या सावकारांच्या होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विशाल हळनोर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे टाकळीभान येथील ज्या सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारून विशाल हळनोर याला त्रास दिला, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
टाकळीभान येथे खाजगी सावकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून व्याजापोटी जमिनी, गाळे, साधने सावकारांनी हडप केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. गरजे पोटी लोक सावकार कडे जातात परंतु त्यांच्या विळख्यात सापडल्याने अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत तर खाजगी सावकार यांकडून गरजे पोटी मोठी लूट केली जात आहे.तरी खाजगी सावकारांना चाप बसावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.