माहिती अधिकार दिन २८ सप्टेंबर रोजी करण्याची मागणी… माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे पाटील
बाभळेश्वर(वार्ताहर) २८ सप्टेबर हा माहिती अधिकार दिन म्हणून प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरा करण्यात यावा अशी मागणी माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
माहिती अधिकार हा सर्व सामान्य जनतेला हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे हि शासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी यासाठी शासकीय अस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने २० सप्टेबर २००८ रोजी शासन आदेश काढून प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करावा असा आदेश दिला आहे.सदर निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देवून नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे. व त्यासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. त्याची प्रत्येक शासकीय कार्यालयात अमलबजावणी व्हावी असा आदेश आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्थानी माहिती अधिकार दिन साजरा करावा अशी मागणी गवारे यांनी केली आहे.