शिर्डी साई बाबा संस्थांच्या वतीने दिनांक 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार
शिर्डी(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळवार दिनांक १६ एप्रिल ते गुरुवार दिनांक १८ एप्रिल २०२४ याकाळात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेंव्हापासून प्रतीवर्षी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी उत्सवाच्या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.०० वा. व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०३.३० ते सायं. ०५.३० वा.निमंत्रीत कलाकारां तर्फे कार्यक्रम होईल तर दुपारी ०४.०० ते सायं. ०६.०० वा. यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० वा. यावेळेत निमंत्रीत कलाकारां तर्फे कार्यक्रम होणार असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.३० वा. श्रींची शेजारती होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी,बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. श्रींचे मंगलस्नान, दर्शन व कावडी मिरवणूक व सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० वा. यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ०३.३० ते सायं. ०५.३० वा.निमंत्रीत कलाकारां तर्फे कार्यक्रम होईल, दुपारी ०४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते १०.०० वा. या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्यामुळे दिनांक १७ एप्रिल रोजीची नित्याची शेजारती व दिनांक १८ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल रोजी पहाटे ०५.०५ वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक, सकाळी १०.०० ते १२.०० वा. गोपालकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०३.३० ते सायं. ०५.३० वा. निमंत्रीत कलाकारांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० वा. निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वा. श्रींची गुरुवारची पालखी मिरवणूक होईल. रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.
उत्सवाचे निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्चरित्राच्या अखंड पारायणामध्ये जे साईभक्त भाग घेवू इच्छीतात अशा साईभक्तांनी आपली नावे मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी ०१.०० वा. ते सायंकाळी ०५.२० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. त्याच दिवशी सायंकाळी ०५.३० वाजता समाधी मंदिरातील मुख दर्शन स्टेजवर चिठ्ठया काढुन पारायण करणा-यांची नावे निवडण्यात येतील. तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्रौ १०.०० ते ०५.०० वा. यावेळेत होणा-या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्ये आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन सर्व साईभक्तांनी या उत्सवास उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. गाडीलकर यांनी केले आहे.
या वर्षीचा श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.