भाद्रपद वैद्य षष्ठी हा दिवस ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी प्रत शुद्धी दिन (जयंती) म्हणून सर्वत्र मोठ्या धार्मिक वातावरणात होतो साजरा– गुरुवर्य ह भ प संजयजी महाराज जगताप ( भऊरकर)
शिर्डी-(-प्रतिनिधी)
आज सोमवार २3 सप्टेंबर 2024भाद्रपद वद्य षष्ठी असून हा दिवस श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणजे श्री ज्ञानेश्वरी प्रत शुद्धी दिन म्हणून साजरा केला जातो. आजही तो मोठ्या भक्ती भावाने धार्मिक वातावरणात व विविध अध्यात्मिक कार्यक्रम करत किंवा श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे वाचन करत साजरा करण्यात येत असे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजय जी महाराज जगताप यांनी म्हटले आहे.आज आपण वाचतो ती संत एकनाथांनी तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत असून तीचे भाद्रपद वद्य षष्ठीला हे काम पूर्ण झाले. म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो.
वास्तविक ग्रंथराज श्री .ज्ञानेश्वरी ग्रंथ नेमका कोणत्या दिवशी पूर्णत्वास गेला .ती तिथी अज्ञात आहे. परंतु संत एकनाथांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम या दिवशी पूर्ण केले. म्हणून हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतात.
संत एकनाथांचे त्यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची ग्रंथाची शुद्ध प्रत तयार करणे हे समजले जाते. एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला. त्यावर औषधोपचार झाले. पण गुण येईना. तिसर्या दिवशी संत ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना म्हणाले, ‘माझ्या मानेस अजानवृक्षाच्या मुळीचा गळफास बसला आहे. तो तू स्वत: येथे येऊन काढ. म्हणजे तुझा घसा बरा होईल. असा दृष्टांत झाला.म्हणून नाथ महाराज समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके १५०५ मधे श्रीक्षेत्र आळंदीस आले.याविषयी नाथांचा अभंगही प्रसिद्ध आहे. श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात ।सांगितली मात मजलागी ॥१॥दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ।परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥अजानवृक्षाची मुळी कंठास लागली ।येऊनी आळंदी काढी वेगे ॥३॥ऐसें स्वप्न होता आलो अलंकापुरी! तंव नदी माझारी देखिले द्वार ४॥एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले! ।श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥या स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीस आले. आळंदीस श्री.सिद्धेश्वराचे स्थान प्राचीन होते. ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते. बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधिस्थानाच्या शोधार्थ निघाले. दूरूनच त्यांना अजानवृक्ष दिसला. समाधीचे दार उघडून ते आत शिरले. तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले. त्यांचे दर्शन होताच संत एकनाथांनी त्यांच्या पायी दंडवत घातले. तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असे केशवांनी नाथचरित्रात लिहीले आहे. अजानवृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवांनी नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिले व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्यची आज्ञा केली. नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधीस्थानावर दगड रचून टाकले.
श्रीक्षेत्र पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे कार्य हाती घेतले. लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते. ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली. नाथांना ज्ञानदेवांचे दर्शन शके १५०५ मधे ज्येष्ठात झाले व ज्ञानेश्वरी संशोधनाचे काम शके १५०६ मधे तारण नाम संवत्सरी संपले. श्री ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शु्द्धिकरणाचा काळ नोंदवला आहे. तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता. तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे .असे नाथांनी सांगितले आहे. तेव्हापासून हा दिवस श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध दिन म्हणजे जयंती म्हणून साजरा केला जातो असेही ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी पत्रकात म्हटले आहे.