ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे घरोघरी मोठ्या उत्साहात व विधिवत आवाहन करत स्थापना!
शिर्डी (प्रतिनिधी ) श्री गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते. यावर्षी 10 सप्टेंबर मंगळवार रोजी या गौरीचे मोठे उत्साहात आगमन सर्वत्र झाले असून ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींची प्रतिष्ठापना शिर्डी व परिसरात ,अनेक घराघरांमध्ये मोठ्या धार्मिक वातावरणात, विधिवतपणे करण्यात आली आहे.
गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत मानण्यात आले आहे. गौरीपूजन हा महाराष्ट्रातील विशेष सण मानला जातो. याला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते.संस्कृतमध्ये गौरी म्हणजे आठ वर्षांची अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गोरी , उज्ज्वल वर्णाची. पुराणानुसार पार्वतीचे एक नाव. भाद्रपद महिन्यात श्रीगणेशाच्या पाठोपाठ गौराईचे आगमन होते. तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही सर्वत्र पाहायला सध्या मिळत आहे.
ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते. यंदा महालक्ष्मीचे आगमन हे १० सप्टेंबरला मंगळवारी सप्तमीला असल्याने अनेक घरांमध्ये या गौरीचे म्हणजेच महालक्ष्मीचे आवाहन करत स्थापना करण्यात आली आहे. सर्वत्र रांगोळ्या, सजावट, विद्युत रोशनाई, फळे फुले, नैवेद्य आदी सर्व तयारी करून या महालक्ष्मीची विधिवत प्रतिष्ठापना ठिकठिकाणी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे .घरातील मुख्य द्वारापासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढण्यात आल्याचे दिसत आहे. . महाराष्ट्रातील काही भागात सुगडाच्या तर काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात. या दिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते. हिंदू धर्मानुसार गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.ती सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते. प्रचलित कथेनुसार, माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
पद्मपुराणानुसार, समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती. लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते. एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान असल्याचे मानले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार, राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे रक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजेने दु:ख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते. मन प्रसन्न होते. अशीही श्रद्धा आहे. अशा गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होताना दिसत आहे. शिर्डी सावळविहीर व परिसरात गौरींचे मंगळवारी आवाहान होऊन स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी या गौरींना मनोभावे पुरणपोळी व इतर मिठाई ,फळे आदींचे नैवेद्य दाखवून आसपास, शेजारील ,नातेवाईक, माहेरवासीन महिलांनाही बोलावून मिष्टांन्न किंवा पुरणपोळीचा भोजनाचा महाप्रसाद देण्यात येतो. तसेच तिसऱ्या दिवशी गुरुवारी या गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मंगळवारी गौरींचे आगमन झाल्याने सर्वत्र घराघरात मोठा उत्साह आहे. गणेश उत्सव व त्यामध्ये गौरींचे आगमन त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली आहे. शिर्डी व परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात, आनंदात हे सण साजरे होताना दिसत आहेत. सावळीविहीर बुद्रुक येथे नाना जाधव यांच्या घरी महालक्ष्मीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच बाळासाहेब दहिवाळ यांच्या घरीही प्रतिष्ठापना करण्यात आली, तसेच युवासेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष किरण जपे यांच्या घरीही गौरीची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक घरोघरी गौरींचे आगमन झाले असून सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे.