रस्त्यावरील वाढदिवस: संस्कृती की विकृती? डॉ.शरद दुधाट
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
मनुष्य हा समाजाचा घटक आहे. समाजात वावरताना एकमेकांशी हितसंबंध जोपासली जातात. जीवन जगताना मनुष्याच्या वैयक्तिक प्रश्नांबरोबरच त्याच्या भोवताली अनेक सामाजिक प्रश्नांची रेलचेल आहे. कारण मी अनुभवलेला हा अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न. ज्याचे उत्तर काय द्यावे, हे कळत नाही. हे उत्तर विकृती असे असेल तर ज्यांच्याकडून ही विकृती घडत आहे, अशा तरुणपिढीला समजावयाचे कसे ? कारण या वयातील ही तरुणपिढी नेहमी समजण्याच्या पलीकडे असते. ती ऐकेल की नाही याची शंका. वाढदिवस साजरा करण्याची एक समाजाची रीत आहे. कुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासमवेत चार भिंतीच्या आतील साजरा केला जाणारा वाढदिवस आपल्या घरंदाजपणाची, संस्कृतीची ओळख करून देतो; परंतु माझ्या भोवताली रस्त्यावरील वाढदिवसांची होणारी रेलचेल, वाढती संख्या विचार करायला भाग पाडते. मनात विचार येतो की, अशा रस्त्यांवरील वाढदिवसांची खरोखर गरज आहे का ? मुळातच वाढदिवस साजरे करावेत का ? हाच प्रश्न आहे. कारण माणसाचे क्षणाक्षणाने वय वाढत आहे. अर्थात जीवन जगण्याच्या एकूण गोळाबेरजेतून त्याचे जीवनमान कमी होत जाते. मग उलट त्याला याचे दुःख वाटणे ऐवजी तो आनंद साजरा करतो. याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. म्हणून नेहमीच्या विषयांपेक्षा आज या लेखाचा विषय मला पडलेला एक ज्वलंत प्रश्न आहे, तोच विषय वाचकांच्या समोर घेतला आहे. कदाचित हा प्रश्न वाचकांनाही पडलेला असेल. या प्रश्नाचे उत्तर निरुत्तरीत राहील असे वाटते. कारण ही बाब शक्तीप्रदर्शन, सामर्थ्यप्रदर्शन, एकसंघता, श्रेष्ठत्व, प्रतिष्ठा यांच्याशी निगडित आहे. रस्त्यांवर वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांची मानसिकता बदलणार केंव्हा? सामाजिकता आणि मानसिकता जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाजाची मानसिकता बदलणे एवढे सोपे नसते, याची परिचिती येते. रस्त्यावरील साजरे होणारी वाढदिवस याविषयी माझे काही अनुभव आहेत. या अनुभवातून आपल्याला जाणवेल की समाजाची मानसिकता बदलायला हवी. माझ्या मते ती संस्कृती होऊ शकत नाही. ती एक विकृती आहे. ती समाजातील एका विशिष्ट वयोगटातील तरुणपिढीची बदललेली मानसिकता आहे. शेकडो तरुण या विकृतीला बळी पडत आहेत. शेकडो टोळ्यांनी मध्यवस्तीत, लोकवस्तीच्या एखाद्या रस्त्यावर एकत्र यायचे. आरडाओरड अर्वाच्य भाषेत मोठ्याने ओरडून शिव्यागाळ्या करायच्या. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध माणसे काही पहायचे नाही. केवळ मित्रत्वाच्या परम सुखात न्हाऊन निघाल्यागत सर्व काही भान विसरून अर्वाच्य भाषेत लाखोल्या वाहायच्या. एकमेकांच्या अंगाला झटून रस्त्यावरच बेशिस्त वातावरण निर्माण करायचे. एका गाडीवर तीन-तीन जण प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी फोनवरील संपर्क अथवा मेसेजवरून एकत्र यायचे. रस्त्यात गाड्यांची गर्दी करायची. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सोयी गैरसोईचा विचार न करता उलट रस्ता अडवून इतरांची अडचण करायची. ग्रुपमध्ये एकाची गाडी आडवी लावायची सीटवर केक ठेवायचा मोठ्या आवेशात वाढदिवसाची गर्जना करायची. किर्कश आरडाओरडा करायचा मग केक कापायचा. एखादा तुकडा भरवला की बाकी केक वाढदिवस असणाऱ्याच्या तोंडाला चोळायचा. यात कुठला आलाय मोठेपणा. उलट हा एक सामाजिक ऱ्हास आहे. प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर वाढदिवस घरात आणि कुटुंबीयांसमवेत अथवा समारंभात सन्मानपूर्वक साजरी करायला हवीत. ही खरी प्रतिष्ठा हा खरा संस्कार. केक तोंडाला चोळून झाला की मग फटाक्यांची आतिशबाजी. अधिक वेळ फटाक्यांची आतिषबाजी करायची. फटाके फोडायचे, भोवताली नागरी वस्ती, वृद्ध, लहान मुले, हॉस्पिटल यांचा कोणताही विचार करायचा नाही. कोणी काही बोलायची सोय नाही. जनसामान्यांच्या मनात एक भीती नव्हे तर ती एक दहशतच. शिर्डीच्या जवळील पिंपळस गावातील घटना तशी ताजीच आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास नित्याचाच. रस्त्यावरील गर्दी आणि गाड्यांची रेलचेल पाहून एका सुजाण व्यक्तीने विचारलेला जाब, त्याला उत्तर मिळते ते लाथाबुक्क्यांनी. या वादाचे प्रकरण पोहोचते थेट दवाखान्यात आणि पर्यायी पोलीस स्टेशनमध्ये. म्हणावे बोलावे कसे. संबंध राजकीय वर्तुळातले. अखेर असे घडत असेल तर सर्वसामान्य माणूसही या तरुणपिढीच्या मानसिकता बदलण्याच्या वादात कधी पडणार नाही. रस्त्यांवरील फटाक्याच्या आतिषबाजीने रस्ता अर्धा बंद करायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांची अडचण. वाढदिवस केक कापून फटाक्याच्या आतिषबाजीपर्यंत थांबत नाही. तो पुढचे रूप धारण करतो. एका मोठ्या वसाहतीत रस्त्यांवर एका गाडीवर ठेवलेले अंड्याचे अनेक ट्रे दिसले. समवेत मोठा तरुणांचा घोळका. मला वाढदिवसाचा अंदाज आला; पण असे काही घडेल असे वाटले नव्हते. नेहमीच्या संभाषणात मैत्रीच्या नात्यातील मधुर शब्दसुमने एकमेकांना वाहिली जात होती. इतर ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटेल अशी ती भाषा प्रेमाची आणि जिव्हाळ्याची वाटली. या वयातून प्रत्येक जण जातो. समाज आणि कौटुंबिक संस्कार विसरून ही तरुणपिढी कशी लयाला जात आहे. याचे वाईट वाटले. नेहमीच्या रस्त्यावरील वाढदिवसाच्या साचेबद्ध पद्धतीने वाढदिवस उरकला. काही वेळातच गाडीवरील ट्रेमधून हातात अंडी घेऊन एकमेकांकडे फेकायला सुरुवात केली. एकमेकांच्या अंगावर, कपड्यांवर अंडी फुटली जात होती. माझ्यासाठी हा एक आश्चर्याचाच धक्का होता. रस्त्यावरील इतर व्यक्ती दुरून हा खेळ पाहत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विस्मयचकितपणा जाणवत होता. अंड्याने डोक्याचे केस कपडे पूर्ण लडबडून गेले होते. हेच का ते भारतीय आदर्श संस्कृतीचे दर्शन? जगभरात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि पावलोपावली तिचे महत्त्व आपण इतरांना सांगतो. मग ही संस्कृती की विकृती? संस्कृती असेल तर ती कुठली ? भारतात लोकशाही पद्धती आहे. मग या लोकशाही तत्त्वाचा विपर्यास का होतोय. देशात कायद्याची रेलचेल आहे. आणखी यासाठी नवा कायदा करून यादीत भर घालावी लागणार का ? टी.व्ही., आकाशवाणी, वर्तमानपत्रातून जनजागृती करून याला थांबवे लागणार का? रस्त्यावरील वाढदिवस नवे नवे रूप धारण करीत आहे. कदाचित याला समाज आणि प्रशासनाने थांबवले नाही तर आणखी वाढदिवस साजरा करण्याच्या नवीन प्रथा जन्माला येतील. मग भूषणाने इतर देशवासीयांना सांगावे लागेल. रस्तेवरील वाढदिवस हा आमच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा आता अविभाज्य घटक झालाय. परदेशात रस्त्यावर कागदाचा तुकडा, कचरा टाकला तर मोठी शिक्षा आणि दंड होतो. वाढदिवस साजरा केल्याचे केकचे पुठ्ठे, कागद, फटाक्याची कागद आणि अंड्यांचा भाग तसाच पडून असतो. मग आपण अपेक्षा करतो की स्वच्छतादूत केंव्हा स्वच्छ करतील. रोज कोणाचा ना कुणाचा वाढदिवस असतो. पहिले पाढे तेच. तरुणपिढीने यातून स्वतःला आवरायला हवे. या असंस्कृतशील पद्धतीला फाटा देऊन पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण, गरजू विद्यार्थी, रुग्ण, विकलांग यांना या वाढदिवसाच्या खर्च पोटी होणाऱ्या खर्चातून मदत करायला हवी. या लेखाचे लेखन करत असताना खाली रस्त्यावर वाढदिवसाची फटाक्यांची अतिशबाजी सुरू झाली, याला काय योगायोग म्हणायचा का? मी जरा स्पष्टच मांडले; परंतु या पाठीमागे हे थांबण्याची आणि वरील बाबींना मदत करण्याची माझी तळमळ आहे, हे एक कटू सत्य आहे.