सावळीविहीर येथे श्री साई सत चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे किर्तन व दहीहंडी फोडून उत्साहात सांगता! भूतलावर पापाचा भार अधिक झाला तर सृष्टी निर्माण करणारा ईश्वर यासृष्टीचा समतोल राखण्यासाठी घेतो अवतार— ह भ प नवनाथ महाराज म्हस्के
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राजकुमार गडकरी
शिर्डी (डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने व दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात सांगता झाली.
सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सत् चरित्र पारायण अखंड हरिनाम सप्ताह 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने दररोज सकाळी श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात श्री साई सत चरित्र ग्रंथ वाचन ,दुपारी भजन ,सायंकाळी हरिपाठ व रात्री जाहीर हरी किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होत होते. बुधवारी रात्री कीर्तनानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उपस्थित भाविकांनी, महिलांनी नाचत, गात, पाळणा म्हणत, आरती करत,फुगड्या खेळत, आनंद साजरा केला. त्यानंतर गुरुवारी गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी अवतरणिका वाचन झाल्यानंतर गावातून श्री साई प्रतिमा व ग्रंथाची टाळ मृदयुगांच्या निनादात व साईंचा जय जयकार करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारायनार्थी व भजनी मंडळ, आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . ग्रंथ मिरवणुकीनंतर हभप नवनाथ महाराज म्हस्के यांचे काल्याचे किर्तन झाले.
या काल्याच्या कीर्तनात हभप नवनाथ महाराज म्हस्के यांनी ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे. अशा सृष्टीमध्ये अनाचार ,अत्याचार वाढला तर ईश्वर अवतार धारण करून अनाचारचा नाश करत असतो. परमात्मा डोळ्यांनी दिसत नाही. मात्र परमात्म्याचा, ईश्वराचा अवतार भूतलावर धारण केल्यानंतर तो दिसतो. मात्र तो ओळखणे सर्वांना शक्य नसते. भगवान परमात्मा हा सगुण रूप धारण करून मृत्यूलोकात अवतार करतो. श्रीकृष्णाने सुद्धा धर्मावर आलेले संकट दूर करण्यासाठी ,पृथ्वीतलावर चाललेल्या पापाचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला.हे फक्त संत ऋषीमुनी महात्मेच ओळखू शकतात. कारण जसे कापसापासून कापड बनते. कापूस कापडात समरस होते. उसापासून साखर बनते, उसाचा रस साखरेत समरस होतो, त्याचप्रमाणे संत संगत व संतवाणीतूनच मनुष्य हा ईश्वर ईश्वरलीन होवू शकतो.असे सांगत या सृष्टीमध्ये चार प्रकारचे ज्ञानी आहेत. एक अज्ञानी, एक अल्पज्ञ, तिसरा तज्ञ व चौथा सर्वज्ञ , अशा या चारही ज्ञानावंतामध्ये सर्वज्ञ हा सर्वश्रेष्ठ असून ते ऋषीमुनी साधुसंत आहेत. अज्ञानी याला काही ज्ञान कळत नाही. अल्पज्ञ याला अल्पशे ज्ञान असते. तर तज्ञ याला एक दोन अशा दोन-तीन विषयात ज्ञान प्राप्त झालेले असते पण तो स्वतःला तज्ञ समजत असतो.मात्र साधू संतांकडे सर्वच गोष्टीचे ज्ञान उपलब्ध असते.
ऋषी मुनी साधू संत यांना भूतकाळ ,वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचेही ज्ञान असते. ते सर्व ज्ञान गुण संपन्न असतात. म्हणून ते सर्वज्ञांनी समजले जातात. प्रत्येकाला फार पूर्वीचा इतिहास भूतकाळ सांगता येणार नाही. मात्र संत महात्मे ते सांगू शकतात. म्हणूनच साधू संतांनी मानवाचे ही भविष्य सांगून ठेवले आहे. कलियुगाची थोरवी पुत्र तो पित्याचा होई वैरी !!दारोदारी पती सोडून ,नारी फेरी,!! अशी परिस्थिती कलियुगात होईल असे साधुसंत यांनी सांगितले होते व त्याचे अनुभव अनेक ठिकाणी आता दिसून येत आहेत. ही सृष्टीची परमेश्वराने पाच तत्वां च्या आधारावर उत्पत्ती केली आहे. आकाश ,वायू ,अग्नी ,पाणी व माती यापासून या सृष्टीची निर्मिती झाली आहे. हे एकमेकांशी एकरूप आहेत. मातीचे ढेकळं जर पाण्यात टाकले तर त्याचे पाणी होते. पाणी अग्नीने नाहीसे होते. अग्निपेटला तर त्याचा वायू तयार होतो. वायु हा आकाशात निघून जाऊन समरस होतो. असे सांगत या तत्त्वांवरच सृष्टीची निर्मिती होऊन नवचैतन्य निर्माण करण्याचे काम ईश्वराने केले आहे. व या सृष्टी मध्ये सर्वांना ज्ञान उपदेश देण्याचे काम संत महात्मे करत असतात. पण संत महात्मे देवाधिकांचे नामस्मरण करण्याला लोकांना वेळ नाही. इतर कामांना वेळ भरपूर आहे. हा संसार मायाजाळ आहे. या संसारात सर्व भौतिक सुखाकडे आकर्षिले आहेत मात्र संकटाच्या वेळी कोणी येत नाही. त्यासाठी आत्मिक सुख आणि ईश्वराचा कृपाशीर्वाद महत्त्वाचा आहे. म्हणून नामस्मरण, पारायण हे महत्त्वाचे आहे. असे सांगत श्रीकृष्णचा गोकुळाष्टमीला जन्म झाला .त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. श्रीकृष्ण हे आठवे अवतार समजले जातात. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या लीला दाखवण्यास सुरुवात केली. पुतणा मावशीचा नाश केला. मथुराच्या राक्षसांना लोणी दूध दूध पाठवायचे नाही म्हणून बाल गोपाळांना घेऊन गोकुळात घराघरात जाऊन ताव मारला. एवढेच नव्हे तर बालगोपाळांना एकत्रित येऊन काला करून सर्वांना हा काल्याचा प्रसाद दिला. या बालगोपाळांना सकस हार देऊन त्यांनी सक्षम बनवण्याचा हजरो वर्षांपूर्वीच त्यांनी प्रयत्न केला. श्रीकृष्णानेच आपल्या लिलेतून हजरो वर्षांपूर्वीच कुपोषण हटाव ही मोहीम एक प्रकारे राबवली होती. हे त्यावरून, त्यांच्या लिलेतून दिसते. अश्या अनेक लीला त्या काळात त्यांनी केल्या आहेत. असे आपल्या कीर्तनातून अनेक दाखले दृष्टांत देत त्यांनी निरूपण केले.
कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन श्री साई सत् चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. त्यासाठी समस्त सावळीविहीर बुद्रुक गावकरी मंडळी ,भजनी मंडळी , तरूण यांनी मोठे परिश्रम घेतले.