शेळीपालनातून शाश्वत उत्पादन शक्य – माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंडकमाले
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले
राहुरी : शेतकर्यांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय किफायतशीररित्या करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन व्यवसाय म्हणून केल्यास त्यापासून शाश्वत उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने तीनदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय मंडकमाले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमर लोखंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विष्णू नरवडे म्हणाले की शेळीपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असावी. किफायतशीर व व्यावसायिक शेळीपालनाबाबत तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी या हेतूने महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील व विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत. आज अखेर २० प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले असून ७६८ प्रशिक्षनार्थींनी त्याचा लाभ घेतलेला आहे. सदरच्या प्रशिक्षणात अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष पालवे यांनी शासनाच्या शेळीपालनासाठी असलेल्या विविध योजना व प्रकल्प आराखडा तयार करण्यासंबधी प्रशिक्षणार्थींना अवगत केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप गो-संशोधन व विकास प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देवकर, संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमर लोखंडे यांनी केले. सदर प्रशिक्षणवर्गासाठी जिल्ह्यातून २० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदरचे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी श्री. संदीप पवार, श्री. गौरव घोलप, श्री. रमेश कल्हापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.