सर्वच विद्याशाखा मध्ये मराठी भाषा सक्तीची व्हावी… डॉ.अविनाश आवलगावकर
(पुणे येथे मराठी विषय महासंघाचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न)
लोहगाव (वार्ताहर)
सध्याच्या काळात मराठी भाषा ही व्यवहारापुरती शिल्लक राहिली असून भाषा ही जगण्याचे साधन आणि जगण्याचा कणा आहे. पुतळ्यांच्या पूजना ऐवजी विचारांची संस्कृती रुजवली जावी. त्यातून मराठी भाषेला प्राधान्य द्यावे. मराठी भाषा सर्वच विद्याशाखांमध्ये सक्तीची व्हावी, अशी अपेक्षा डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले.
पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाच्या वतीने एकदिवशीय राज्यस्तरीय जिल्हा प्रतिनिधी मार्गदर्शन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते ग्रंथाला पुष्प वाहून संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सचिव बाळासाहेब माने यांनी केले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर भोसले, मराठी महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, सचिव बाळासाहेब माने यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. प्रतिभा बिस्वास, सहसचिव बापू खाडे समन्वयक डॉ. राजेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष दिलीप जाधव, प्रा. संजय लेनगुरे, सल्लागार विजय हेलवटे, संजय पाटील, नीता खोत, डॉ. अंजना खताळ, प्रकाश अंकुश यांच्यासह महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात मराठी विषय शिक्षकांच्या विविध समस्या आणि उपाययोजना या विषयावर चर्चा संपन्न झाली. महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले, कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, सचिव बाळासाहेब माने यांच्या हस्ते जिल्हा प्रतिनिधींना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्रा. सुनील डिसले यांनी मराठी भाषा आणि तिच्या संवर्धनासंबंधी शिक्षकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन शिबिर यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. पांडुरंग कंद व पुणे जिल्ह्यातील कार्यकारणीतील सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग कंद यांनी केले तर आभार डॉ. मनीषा रिठे यांनी मानले.
.