महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती साजरी
लोहगाव (वार्ताहर) राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्य अलका आहेर, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे व प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तनुजा भालेराव हिने कर्मवीरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवरानगर संकुल ते लोहगाव कमानीपर्यंत कर्मवीरांच्या देखाव्यांसह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्या विभागाच्या वतीने कलशधारी विद्यार्थिनी व लेझीम पथक, विद्यार्थी वसतिगृहातील झांज पथक, गुरुकुल आश्रमातील विद्यार्थ्यांचे वारकरी पथक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या टिपरी पथकाने संकुल ते तांबेनगर व नेहरूनगर येथे आपल्या विविध कलांचे केलेले प्रात्यक्षिक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी परिसरातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी औक्षण करून अभिवादन केले. मिरवणूक मार्गावर महिलांनी सड्यासह रांगोळ्या काढल्या होत्या. ही मिरवणूक यशस्वी संपन्न होण्यासाठी संकुलातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.