त्याग व समर्पण हाच रयतेचा आदर्श …प्रमोद तोरणे
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांच्या शिक्षणाचा आधार असून शिक्षकांचा त्याग आणि समर्पण हाच रयतचा खरा आदर्श आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सहाय्यक निरीक्षक प्रमोद तोरणे यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त परीक्षा आणि सदिच्छा समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंगद काकडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रमोद तोरणे व इतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्या अलका आहेर यांनी केले. यावेळी जय ताजने, अनन्या भोर, कृष्णा शिरसाठ या विद्यार्थ्यांनी आपली मनोगतातून महाविद्यालयाप्रती आपला कृतज्ञभाव व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.शरद दुधाट यांनी ‘तणावमुक्त परीक्षा’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी, शरद चेचरे, प्रा. रमेश आहेर, ताजने सर, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य तोरणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना निर्भयपणे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी,याबद्दल दिलासा दिला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य काकडे यांनी रयतची वाटचाल ही कौशल्य विकास व मूल्याधिष्ठीत शिक्षणाकडे होत असून रयतच्या शिक्षण प्रक्रियेतून संस्कारशील विद्यार्थी घडावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.दुधाट यांचा ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दुधाट व प्रतिभा ठोकळ यांनी केले. तर शेवटी हिरा चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.