शिर्डी एमआयडीसीच्या मंजूर जागेत जेसीबी, पोकलेन च्या साह्याने झाडे झुडपे, बाभळी काढण्याचे काम वेगाने सुरू! प्राथमिक स्तरावरील काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान!
शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शासनाने अ.नगर जिल्ह्यात शिर्डी व नगर अशा दोन एमआयडीसी मंजूर केल्या आहेत. या मंजूर शिर्डी एमआयडीसीच्या जागेत आता वेड्या बाभळी, अनेक वर्षापासून पडित जमिनीत वाढलेले झाडे झुडपे काढण्याचे व साफसफाईचे काम जेसीबीच्या साह्याने गेल्या चार-पाच दिवसापासून वेगाने सुरू झाले आहे. प्रथम येथे रस्ते बनवण्यासाठी असणाऱ्या जागेतील वेड्याबाभळी, वाढलेली झाडे, गवत, काढण्यात येत आहे. येथे शेकडो एकर जमीन ही गेल्या अनेक वर्षापासून पडीत होती . त्यामुळे येथे वेड्या बाभळी झाडे झुडपे मोठी वाढली. ते काढण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात येथे हे काम सुरू झाल्याने या परिसरातील गावांमधील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने शिर्डीला एमआयडीसी मंजूर झाली. लक्ष्मीवाडी शेती महामंडळाच्या मळ्यातील सावळीविहीर ,सोनेवाडी, नगद वाडी आदी भागात येणाऱ्या सावळीविहीर येथील श्री भवानी माता मंदिराच्या शेजारी असणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्याच्या पश्चिम बाजूला , आणि वेस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उत्तर दिशेला असणाऱ्या शेती महामंडळाच्या जमिनीत एमआयडीसी होणार आहे. येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा फलक ही लावण्यात आला आहे.
तसेच इथून पुढे श्री लभाण बाबाच्या मंदिराच्या थोडे पुढे रेवगडे बंद क्रेशर जवळून के.के मिल्क कडे मोठा नियोजित रस्ता असल्याचे बोलले जात आहे.व येथून रस्ता होण्यासाठी प्रथम येथील झाडे काढून साफसफाई करण्यात येत आहे. दोन-तीन पोकलेन, चार-पाच जेसीबीच्या साह्याने हा मुख्यरस्ता याबरोबरच एमआयडीसी मधील काही अंतर्गत रस्ते होण्याच्या जागेमधील वेड्या बाभळी, झुडपे, काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.त्यामुळे प्रत्यक्षात येथे प्राथमिक स्तरावर का होईना काम सध्या सुरू झाल्यामुळे सावळीविहीर व परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये नवचैतन्य पसरले असून येथे एमआयडीसी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तरुणांना काम धंदा मिळणार आहे. उद्योगधंदे वाढणार आहेत. व्यवसायाला चालना मिळणार आहे .आर्थिक सुबत्ता येथे येणार आहे. त्यामुळे सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर खुर्द,सोनेवाडी, नगदवाडी, या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून शिर्डी एमआयडीसी मंजूर करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच येथे मोठमोठे उद्योग यावे यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह येथे एमआयडीसी मंजूर केली त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना.अजित दादा पवार व संबंधित मंत्री महोदयांचे परिसरातील नागरिकांमधून धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.