.राज्य सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा विचार करावा… शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे
टाकळीभान (प्रतिनिधी)
राज्य सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत दूध उत्पादक शेतकरी या सरकारला त्यांचा दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी आज श्रीरामपूर येथील रस्ता रोको आंदोलनात दिला आहे.
राज्यात दुधाचे भाव ढासाळल्याने शेतकरी संघटना व उंदीरगावश पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सकाळी 11.30 वा सुरू झालेल्या या आंदोलनातमुळे नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.रखरखत्या उन्हात शेकडोंच्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाद्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवसेनेचे लखन भगत, संजय छलारे,वंदना मुरकुटे,सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, प्रभाकर कांबळे, डॉ. दादासाहेब अधिक, डॉ. विकास नवले, डॉ.रोहित कुलकर्णी, भास्कर तुवर,गोविंद वाघ, शरद असणे आदींसह अनेक जण उपस्थित होते.
ॲड.अजित काळे पुढे म्हणाले की शेतकऱ्याचे कुठलही पीक बाजारात आले की सरकार त्याचे भाव पाडते.आज दुधाला 22 रुपये भाव मिळत आहे. ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी तोच भाव 38 रुपयांपर्यंत होता.त्या नंतर दोन वर्षात दूध दर 22 रुपयांवर खाली आले.याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. त्यांनी जाहीर केलेले प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान 5 टक्के शेतकऱ्यांच्या पुढे देखील कुणाला मिळाले नाही.दररोज 2 कोटी लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाते आहे. त्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागेल आणि दुधाला 40 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल.काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना लुटण्याची भूमिका घेतली तर त्यानंतर भाजपा सरकारने त्यावर कडी करत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले.शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर शेतकरी विरोधी महायुती सरकार असे अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, दूध उत्पादक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची नैतिक जबाबदारी ही राज्यातल्या 288 आमदारांची आहे. त्यांनी येत्या अधिवेशनात या प्रश्नांवर आवाज उठवावा, अन्यथा शेतकरी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
याप्रसंगी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.