शेतीसाठी तातडीने गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन देण्यात यावे…ॲड.पंकज लोंढे.
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
यावर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. विहिरी, बोअरवेल यांचे पाणी कमी झालेले आहे त्यामुळे उभ्या फळबागा व जनावरांसाठी केलेला चारापिके पाण्याभावी सुकून चाललेला आहे. फळबागा व चारा पिकांसाठी तातडीने पाण्याची आवश्यकता आहे तरी गोदावरी उजव्या कालव्यातून तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष ऍड.पंकज लोंढे यांनी केले आहे.
ऍड.पंकज लोंढे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राहाता तालुक्यात बहुतांश मंडलात सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे त्यामुळे केंद्रातील व राज्यातील मंत्री, आमदार, खासदार हे त्यांच्या पक्षाच्या प्रचारात दंग आहेत, सरकारी अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, त्यांचे दुष्काळ निवारण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यावर कोणतेही लक्ष नाही. बारा महिने निवडणुकीच्या मूडमध्ये असणाऱ्या भाजप सरकारचे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे कोणतेही लक्ष नाही. वेळेत आवर्तन न सोडल्यास फळबागा व चार पिकांचे प्रचंड नुकसान होवून जनावरांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
जलसंपदा विभागाकडून कोणतीही आवश्यकता नसताना नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला नवीन दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे पावसाळ्यात ओव्हरफ्लो पाण्यापासून गोदावरी उजवा कालव्याचे लाभक्षेत्र वंचित राहणार असून तो निर्णय जलसंपदा विभागाने तात्काळ मागे घ्यावा.
गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेली चारापिके व फळबागांसाठी पाण्याची तातडीची गरज आहे, दारणा धरण समूहामध्ये एक आवर्तन होईल इतके पाणी शिल्लक आहे त्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन देवून चार पिके, फळबागा यांना जीवदान द्यावे. अशी मागणी ऍड. लोंढे यांनी केली आहे
चौकट
गोदावरी उजव्या कालव्यातून शेतीसाठी त्वरीत आवर्तन न दिल्यास तसेच नांदूर मधमेश्वर बधाऱ्याला नवीन दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा निर्णय मागे न घेतल्यास व दुष्काळाच्या उपाययोजना त्वरीत लागू न केल्यास कॉंग्रेस कमिटी व महाविकास आघाडी यांच्यातर्फे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेवून आंदोलन छेडले जाईल.ऍड.पंकज लोंढे ,अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी