साईबाबा संस्थांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदन!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
एक जुलै रोजी चंद्रयान ३चे प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्टर डायरेक्टर कल्पना यांनी साईबाबा मंदिरात येऊन चांद्रयान ३चा नमुना श्री साई चरणी ठेवून केली होती पूजा!
शिर्डी (प्रतिनिधी )चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान यशस्वीपणे उतरवण्याचा मान भारताने अखेर पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. बुधवारी (दि. २३) अहमदनगर येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीच्या बैठकीत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश तथा तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यरलगड्डा, जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य सिध्दराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सदस्य पी. शिवा शंकर व श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी सांगितले की, चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी १ जुलै रोजी चांद्रयान-३ चे प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर कल्पना यांनी साईबाबा समाधी मंदिरात येऊन चांद्रयान-३ चा नमुना श्री साई चरणी ठेऊन पूजा केली होती. साईसंस्थानकडून यावेळी वीर मुथुवेल यांच्याकडे साईबाबांचा प्रसाद देऊन चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण होण्यासह त्याचे यशस्वी लँडिंग व्हावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयान-२ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान-३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करून दाखवला आहे.